Mumbai cyber fraud While Selling Unique Notes : आपल्याला दैनंदिन व्यवहार करताना एखादं वेगळं नाणं, विशिष्ट नोट, खास नंबर असलेली (सिरीज) नोट मिळाली तर आपण ती जपून ठेवतो. बऱ्याचदा अशा नोटा व नाण्यांची अनधिकृतपणे खरेदी-विक्री देखील केली जाते. मुंबईतील एका महिलेने तिच्याकडील अशीच एक जपून ठेवलेली विशिष्ट सिरीजमधील नोट विकून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सायबर ठगां टाकलेल्या जाळ्यात अडकली आणि तब्बल आठ लाख रुपये गमावून बसली. या ४९ वर्षीय महिलेने फसवणूक झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे.
या महिलेने समाजमााध्यमांवर एक जाहिरात पाहिली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की तुमच्याकडे विशिष्ट सिरिजमधील जुन्या चलनी नोटा व नाणी (विंटेज कॉइन्स आणि युनिक नोट्स) असतील तर तुम्ही ती आम्हाला देऊन चांगले पैसे कमावू शकता. या महिलेकडे ७८६ सिरीजमधील एक चलनी नोट आणि २५ पैशांची काही नाणी होती. त्यामुळे तिने जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क केला. त्यानंतर तिचं एका व्यक्तीशी बोलणं झालं. तिने त्या व्यक्तीला तिच्याकडे असलेली नोट व नाण्यांचे फोटो पाठवले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला तिच्याकडील नोट व नाण्यांच्या बदल्यात प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं.
‘अशी’ केली फसवणूक
महिलेने आरोपीला सांगितलं की ती हा व्यवहार करण्यास तयार आहे. त्यानंतर आरोपीने तिला प्रक्रिया सुरू करण्यासाठी सुरुवातीला काही पैसे पाठवण्यास सांगितलं. आरोपीने सदर महिलेला जीएसटीचं कारण सांगून, उशिरा पेमेंट केल्याचं कारण सांगून पैसे उकळण्यास सुरुवात केली. १२ ते १४ जुलै दरम्यान आरोपीने महिलेला वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून ८.४६ लाख रुपये उकळले. हे पैसे उकळत असताना तिला तिचे पैसे परत मिळतील आणि तिच्याकडील नोट व नाण्यांच्या बदल्यात दिली जाणारी रक्कम (प्रत्येकी आठ लाख रुपये) देखील मिळेल असं सांगितलं.
आरोपीला ८.४६ लाख रुपये दिल्यानंतर महिला तिला पैसे कधी मिळणार याची वाट पाहात बसली होती. त्यानंतर तिने आरोपीच्या फोन नंबरवर फोन केला. वेगवेगळ्या तीन फोनवरून तिने आरोपीला फोन केला. मात्र, आरोपीने फोन उचललाच नाही. त्यामुळे महिलेला कळलं की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने पायधुनी पोलीस ठाणं गाठलं. पायधुनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे सायबर गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी?
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की ही सायबर गुन्हेगारांची नेहमीची मोडस ऑपरेंडी आहे. यामध्ये गुन्हेगार पीडितांना आकर्षित करण्यासाठी गुंतवणूक किंवा मोठ्या परताव्याचं अमिष देतात. पीडित व्यक्ती जाळ्यात अडकतेय असं समजताच वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळतात.