अपघातांना निमंत्रण, ठाण्यातही बेशिस्त वाहनचालक
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघातांना आमंत्रण देणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत मुंबईकर आघाडीवर आहेत. या गुन्ह्यासाठी २०२० मध्ये ३३ हजार ई चलान पाठविण्यात आले असून गेल्या वर्षी ६४ हजार १७८ चलान पाठविल्याची माहिती राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
परवानगी नसतानाही किंवा वाहतूक पोलिसांनी फलकाद्वारे माहिती देऊनही काही वाहनचालक एखाद्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा प्रयत्न करतात. परवानगी नसतानाही त्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा प्रयत्न केल्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. समोरून येणाऱ्या वाहनाला धडकणे, अंदाज न आल्यामुळे अपघात होतात. यात वाहनामुळे पादचारीही जखमी किंवा मृत होण्याच्या घटना घडतात. अशा वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते.
मुंबई महानगरात होणाऱ्या कारवाईत मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे गुन्हे सर्वाधिक घडत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत २०२१ मध्ये एकूण १ लाख ९१ हजार २९६ ई चलान पाठविण्यात आले. तर एकूण १९ कोटी १२ लाख ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यापैकी ६४ हजार १७८ चलन मुंबईमधील बेशिस्त वाहनचालकांना पाठविण्यात आली असून २०२० मध्ये त्यांची संख्या ३३ हजार २५१ इतकी होती.
करोनामुळे र्निबध शिथिल झाल्यानंतर वाढलेल्या वाहतुकीमध्ये वाहनचालक मोठय़ा प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक दिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याविरोधात गेल्या वर्षी ठाणे शहरात संबंधितांना २२ हजार ३१ ई चलान पाठविण्यात आले असून २०२० मध्ये त्यांची संख्या २५ हजार ३५० इतकी होती. याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. तर मीरा भाईंदरमध्ये ५,२९५, नवी मुंबईत ८,६३६ ई चलान पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतही मुंबईत ८५६ ई चलान या प्रकरणात पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
न्यायालयामार्फत दंड आकारणी
विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस यापूर्वी एक हजार रुपये दंड वसूल करीत होते, परंतु नुकत्याच नवीन दंड आकारणीला सुरुवात केल्यानंतर यात बदल करण्यात आला. आता न्यायालयामार्फत दंड आकारणी होऊ लागली आहे.