लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईमध्ये विविध साथीच्या आजारांचे तब्बल १,३९५ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गस्ट्रो आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत जूनमध्ये विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये साथीच्या आजारांचे १,३९५ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक ७२२ रुग्ण सापडले. त्याखालोखाल हिवतापाचे ४४३, कावीळ ९९, डेंग्यू ९३, लेप्टो २८ आणि स्वाईन फ्लूचे १० रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते मे २०२४ मध्ये मुंबईत विविध साथीच्या आजारांचे जवळपास ५,६९७ रुग्ण आढळले होते. यामध्येही गॅस्ट्रोचे ३,४७८ रुग्ण तर हिवतापाचे १,६१२ रुग्ण सापडले आहेत.

आणखी वाचा-म्हाडा घरांच्या सोडतीत गैरप्रकार, चौकशी अहवाल सादर होण्यापूर्वीच विजेत्यांना घरे वितरणाचा घाट?

साथीच्या आजारांना रोखण्यासाठी यंदा एप्रिलपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. परिणामी यंदा गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा रुग्णसंख्येत घट

मुंबईत यंदा जूनमध्ये साथीच्या आजारांचे १३९५ रुग्ण सापडले आहेत. मात्र गतवर्षी जूनमध्ये साथीच्या आजारांचे ३०१२ रुग्ण सापडले होते. यामध्ये गॅस्ट्रोचे १७४४, हिवताप ६३९, डेंग्यू ३५३, कावीळ १४१, लेप्टो ९७, स्वाईन फ्ल्यू ३०, चिकनगुनिया ८ रुग्ण होते.