घरांचा ताबा तात्काळ सोडून संक्रमण शिबिरात आसरा घेण्याचे रहिवाशांना आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षीचा नेम राखत पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची घोषणा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात येते. यंदाही शहरातील ठिकठिकाणच्या मिळून ११ इमारती अतिधोकादायक असल्याचे बुधवारी ‘म्हाडा’च्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर केले. येथील नागरिकांनी या घरांचा ताबा तात्काळ सोडून संक्रमण शिबिरात आसरा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दर वर्षी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या तसेच उपकरप्राप्त असलेल्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात ११ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या इमारतींमध्ये गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ४ इमारतींचा समावेश असून या एकूण इमारतींमध्ये ३७९ निवासी तर ३१० अनिवासी असे ६८९ रहिवासी व भाडेकरू राहतात. यांपैकी १२२ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून सहा जणांनी स्वत:च आपली पर्यायी व्यवस्था केली आहे. मात्र उर्वरित २८२ रहिवाशांना संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असून या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री मेहता यांनी केले. म्हाडातर्फे दरवर्षी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी सादर करण्यात येते. मात्र, यातील अनेक नागरिक संक्रमण शिबिरात जाण्यास विरोध दर्शवतात. तसेच काही जण घर रिकामे करण्याच्या मुद्दय़ावर न्यायालयातही जातात. यामुळे बऱ्याचदा यादी घोषित करण्याचा फार्स ठरत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून जर रहिवासी न्यायालयात गेल्यास न्यायालयालाही विनंती करणार असल्याची सारवासारव मेहता यांनी केली.

अतिधोकादायक इमारती

१)            १४४, एम. जी. रस्ता, एक्सप्लेनेंड मेन्शन

२)            ४४-४६ काझी स्ट्रीट

३)            १०८-११२ शेख मेमन स्ट्रीट

४)            गोरागांधी चाळ इ. क्र. १२२ सी, खेतवाडी, बॅक रस्ता

५)            ३९ चौपाटी, सी फेस

६)            २०८-२२० काझी सय्यद स्ट्रीट

७)            ५५-५७ नागदेवी क्रॉस लेन

८)            इमारत क्र. १३-एफ, चकला स्ट्रीट

९)            ६-६ ब, चमार लेन, भायखळा

१०)          ४६-५०, मिर्झा गालिब रस्ता (क्लेअर रस्ता), भायखळायेथील लकी मेन्शन

११)          घरकुल, एन. एम. जोशी मार्ग, भायखळा

२४ तास नियंत्रण कक्ष

पावसाळ्यात इमारत कोसळल्याचे निदर्शनास आल्यास मंडळाने रजनी महल, ताडदेव, मुंबई येथील इमारत क्रमांक ८९-९५ येथे २४ तास नियंत्रण कक्ष उघडला असून हा २४ तास चालणार आहे. या कक्षात उपअभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी हजर राहणार असून इमारत कोसळल्यास हे अधिकारी जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक ९१६७५५२११२ तसेच २३५३६९४५/२३५१७४२३.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais 11 dangerous building declared
First published on: 02-06-2016 at 02:36 IST