मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यात ९ मेपासून वाढ करण्यात आली. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना प्रवासासाठी दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. भाडे वाढले असले तरी बेस्टच्या सेवेत बदल झालेला नाही. बेस्टच्या फेऱ्यांची वारंवारता कमी असल्याने अवेळी बस सेवा, वातानुकूलित यंत्रणा न चालणे यामुळे प्रवाशांची संख्या घटत आहे. परिणामी, मे महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या ३० ते ३२ लाखांवरून २५ लाखापर्यंत घसरली आहे. तब्बल ५ ते ७ लाख प्रवासी घटले आहेत.
भाडेवाढ किती झाली
बेस्ट उपक्रमाची आर्थिक गणिते सुधारण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली. बेस्ट उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक बसपासच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला. साध्या बससाठी किमान १० रुपये तिकीट भाडे आणि वातानुकूलित बससाठी किमान १२ रुपये तिकीट भाडे द्यावे लागत आहे. दैनंदिन बसपासचे शुल्क ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. मासिक शुल्क ९०० रुपयांवरून एक हजार ८०० रुपये केले. विनावातानुकूलित बसचे किमान भाडे ५ रुपये आणि वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपये होते. हे भाडे दुप्पटीने वाढल्याने जवळचे ठिकाण गाठून, बेस्ट बसचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली.
मे २०२५ मध्ये किती प्रवासी
मे २०२५ दरम्यानच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या ५ कोटी ९५ लाख होती. त्यानुसार दैनंदिन सरासरी २०.५५ लाख प्रवाशांचा प्रवास झाला. बेस्ट बसद्वारे दैनंदिन ३० ते ३२ लाख प्रवाशांचा प्रवास होत होता. परंतु, भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे.
बेस्ट प्रशासनाचे म्हणणे काय
बेस्ट उपक्रमाचा संचित तोटा कमी करण्याकरीता व जास्तीत जास्त प्रवाशांना वक्तशीर, आरामदायी उपक्रमाच्या बस सेवेचा लाभ घेता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाच्या प्रवास भाड्याचे सुसूत्रीकरण करण्यात आले. त्यात विनावातानुकूलित व वातानुकूलित बसगाडयांचे अनुक्रमे किमान प्रवासभाडे ५ रुपयांवरून १० रुपये आणि ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. ९ मे २०२५ रोजीपासून प्रवास भाड्याचे सुसूत्रीकरण केल्यानंतर दैनंदिन उत्पन्नात व प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ६ ऑगस्ट रोजी उपक्रमाची प्रवासीसंख्या २५ लाखांवर पोहचली असून दैनंदिन उत्पन्न ३.२५ कोटी झाले आहे. येत्या काही कालावधीत प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढेल. परिणामस्वरूप उत्पन्नातील घटही कमी होईल व अंतिमतः उपक्रमाचे एकूण उत्पन्न वाढेल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे बेस्ट प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.
बेस्टच्या ताफ्यात किती बस
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २,६८७ बस असून स्वमालकीच्या ४१८ बस आहेत. तर, भाडेतत्त्वावरील २,२६९ बस आहेत.