न्यायालयीन आदेशांनंतर सरकारी डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर वरवरची मलमपट्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले तसेच यातून निर्माण होणारा सुरक्षेचा पेचप्रसंग यावर उपाय म्हणून मुंबईतील प्रत्येक सरकारी रुग्णालयात चार सशस्त्र पोलीस तैनात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशांचे सरकारतर्फे तंतोतंत पालन करण्यात आले असले तरी, रुग्णालयांचा विस्तीर्ण परिसर, डॉक्टरांची संख्या आणि या ठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येने येणारे रुग्ण या तुलनेत हा बंदोबस्त वरवरची मलमपट्टी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबईतील शीव, जेजे, केईएम आणि नायर या महत्त्वाच्या चार रुग्णालयांत न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रत्येकी चार पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. मात्र या प्रत्येक रुग्णालयांत दर दिवसाला शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. रुग्णालयाचा विस्तृत परिसर, डॉक्टरांची संख्या, सतराशेसाठ इमारती, उपलब्ध खाटांची संख्या पाहता ही सुरक्षा व्यवस्था कुणाच्या पाचवीला पुजणार, असा प्रश्न  आहे. येथे दररोज खाटांच्या तुलनेत दुप्पटीने रुग्ण दाखल होत असतात. प्रत्येक रुग्णाला तोंड देताना डॉक्टर व परिचारिकांना नाकीनऊ येते. त्यातून अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर-परिचारिका यांच्यात वाद होतात. प्रसंगी डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की वा मारहाण होण्याचे प्रकारही घडतात. या पाश्र्वभूमीवर चार पोलिसांचा बंदोबस्त अपुरा असल्याचा सूर रुग्णालयांतून व्यक्त होत आहे. अशा वरवरच्या उपाययोजना करण्याऐवजी रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संवाद वाढण्याबरोबरच सरकारी रुग्णालयांचे विकेंद्रीकरण करून डॉक्टरांवरील कामाचा भार व ताण कमी करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टरवर्गाकडून व्यक्त होते आहे.

सरकारी रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या सेवेकरिता असलेल्या डॉक्टरांची संख्या हे प्रमाण खूपच व्यस्त आहे. एकटय़ा जेजेमध्ये दररोज ३५०० रुग्ण उपचाराकरिता येतात, तर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही जवळपास तेवढेच रुग्ण येतात. प्रत्येक रुग्णासोबत किती नातेवाईकांना प्रवेश द्यायचा यावर मर्यादा हवी. न्यायालयानेही ही बाब लक्षात घेऊन केवळ दोनच नातेवाईकांना एका वेळी प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याचे पालन केले जात नाही. त्याबरोबरच एका रुग्णासोबत जास्त नातेवाईक थांबल्यामुळे इतर रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जेजे रुग्णालय

हे रुग्णालयात ४२ एकर जागेत वसलेले आहे. १३५० खाटा उपलब्ध असून दिवसाला खाटांच्या दुप्पट म्हणजेच ३५०० रुग्ण दाखल होतात. तर प्रत्येक दिवसाला २०० आणि वर्षांला ४२ हजार शस्त्रक्रिया होतात.

नायर रुग्णालय

हे रुग्णालय २२ एकर जागेत उभे आहे. १६२३ खाटा असून दिवसाला तीन ते साडेतीन हजार रुग्ण दाखल होतात.

सायन रुग्णालय

हे रुग्णालय सहा एकर जागेत उभे आहे. १८०० खाटा असून प्रत्येक दिवसाला तीन ते चार हजार रुग्ण दाखल होतात. तर दिवसाला २० शस्त्रक्रिया होतात.

केईएम रुग्णालय

हे रुग्णालय अडीच एकर जागेत उभे आहे. १८०० खाटा असून दरदिवसाला २१५० रुग्ण दाखल होतात. तर दिवसाला १५० शस्त्रक्रिया होतात.

दहाच दिवसांत हल्ले

गेल्या दहा दिवसांत पुणे, औरंगबाद, नांदेड येथे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी केईएम रुग्णालयात तीन डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. या वेळी सुरक्षारक्षकाच्या हातातील काठी घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. तर दीड महिन्यापूर्वी नायर अणि सायन रुग्णालयांतील डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले होते.

रुग्णालयात पोलीस तैनात करण्याऐवजी डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते सुदृढ होण्याची गरज आहे. पोलीस तैनात करून डॉक्टरांवरील हल्ले कमी होणार नाही. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये संवाद वाढण्याची गरज आहे.

– डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता जेजे रुग्णालय

डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवाद वाढणे गरजेचे असले तरी सध्या निवासी डॉक्टरांना तेवढा वेळच मिळत नाही. दिवसाचे १८ तास डॉक्टर काम करीत असतात. मुंबईतील ६८ टक्के डॉक्टर तणावाखाली असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले आहे. नॅशनल हेल्थ प्रोफाइलच्या अहवालानुसार एक डॉक्टर ११०० रुग्णांवर उपचार करतो. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढविणे किंवा सरकारी रुग्णालयांचे विकेंद्रीकरण करणे हा त्यावरील पर्याय आहे.

– डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष, मार्ड ही निवासी डॉक्टरांची संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal hospital security issue
First published on: 05-08-2016 at 03:12 IST