मुंबई : राज्यातील २८ महानगरपालिकांतील कामगार – कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्र शासनान त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. पगार, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सहाय्य या मुद्द्यांवर राज्यातील सर्व महानगरपालिकांचे कामगार – कर्मचारी एकवटले असून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका- नगरपालिका, कामगार – कर्मचारी संघटना फेडरेशनतर्फे लवकरच पुण्यात मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

महापालिकेतील कामगारांचे थकीत पगार, जुनी निवृत्ती वेतन योजना, वाढते कंत्राटीकरण, आणि आरोग्य संरक्षणाचा अभाव या सर्व प्रश्नांकडे शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप विविध महापालिका कामगारांकडून केला जात आहे. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका- नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनने १० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्था कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत २२ महानगरपालिकांतील पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

तीन ते चार महिन्यांचे पगार न मिळणे, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे. वाढते कंत्राटीकरण, रुग्णालयांमध्ये नर्सिंग कौन्सिल आणि सलीम मर्चंट अवॉर्डप्रमाणे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण निश्चित करणे, सर्व कर्मचाऱ्यांना २० लाख व अधिक रुपयाची वैद्यकीय सहाय्याची योजना लागू करणे या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लवकरच पुण्यात कामगार – कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी मेळाव्यासाठी २४ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे मेळाव्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

अनेक महानगरपालिकांतील कामगारांचे ४ ते ६ महिन्यांचे पगार थकीत आहेत. याबाबत संबंधित महापालिका आयुक्तांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप समस्या सुटलेली नाही. मेळाव्यात येणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ व्हावी, त्यांच्यापर्यंत मेळाव्याची माहिती पोहोचावी, यासाठी ठरलेली तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मेळाव्यात सुमारे १० हजार कामगार – कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका- नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी दिली.