मुंबई : माझगावमधील सूर्यकुंड सोसायटीच्या गटारात सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा छडा लावून मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली. बिहारमधील जमिनीच्या वादातून केशव चौधरी (३५) याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.
माझगावमधील गनपावडर रोड येथील सूर्यकुंड महापुरुष सोसायटीच्या गटारामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृत व्यक्तीच्या डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. याप्रकरणी मारहाण करून राऊल ऊर्फ केशव चौधरीची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
प्राथमिक तपासात सोसायटीतील सुरक्षा रक्षक गिरधारी राय (२२) हत्येत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रीकरण व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. बुधवारी पोलिसांनी मृत्यूंजय झा (३६) याला शिवडी परिसरातून अटक केली. तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. चौकशीत त्याने गिरधारी राय व सनीकुमार जयवंत चौधरी यांच्या मदतीने केशव चौधरीची हत्या केली. आरोपींनी चौकशीत हत्येची कबुलीही दिली.
भुसावळ येथे रेल्वेतून बिहारला पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या गिरधारी राय आणि त्याचा साथीदार सनीकुमार चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. सर्व तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, बिहारमधील जमिनीच्या वादातून गिरधारी राय हा मुख्य आरोपी असून त्यानेच चौधरीला आपल्या केबिनमध्ये बोलावले होते. जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रायने त्याला मारहाण करून ठार केले व मृतदेह गटारात फेकला. “रायने ही हत्या जमिनीच्या वादातून केल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.