कसे आणि कोण करतात उपचार वाचा…

मुंबई : सेरेब्रल पाल्सी, शारीरिक व मानसिकदृष्ट्या गतिमंद, आत्मकेंद्री, पार्किन्सन यासारख्या विविध आजाराने ग्रस्त असलेल्या विशेष मुले व व्यक्तींवर उपचार करणे डॉक्टरांसाठी फारच अवघड असते. त्यातच त्यांच्या दातांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र नायर दंत रुग्णालयातील दंत सुरक्षा विभागामध्ये अशी मुले आणि व्यक्तींवर आपुलकीने उत्तमरित्या उपचार करण्यात येत आहेत. महिन्याला साधारणपणे १० ते १५ विशेष रुग्णांच्या दातांवर उपचार करण्यात येत आहेत.

दातांवर उपचार करताना रुग्णांनी हालचाल केल्यास त्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यात रुग्ण हे सेरेब्रल पाल्सी, शारीरिक व मानसिकदृष्ट्या गतिमंद, आत्मकेंद्री, कर्करोगग्रस्त, आकडी येणारी मुले, व्यक्तींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. हे विशेष रुग्ण दंत शस्त्रक्रिया करताना फार काळ स्थिर राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नायर दंत रुग्णालयामधील दंत सुरक्षा विभागामध्ये अशा विशेष व्यक्तींची प्रेमाने काळजी घेत करण्यात येणाऱ्या उपचारामुळे विशेष व्यक्तींचा उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य रुग्णाला उपचारासाठी १५ ते २० मिनिटे लागणार असतील तर त्याच उपचारांसाठी विशेष रुग्णांना एक ते दीड तास लागतो.

हेही वाचा >>> भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

उपचारापूर्वी विभागातील परिचारिका दिव्या तरळ आणि प्रविदा नारकर त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने गप्पा मारत, त्यांची काळजी घेत त्यांना उपचारासाठी तयार करतात. उपचारादरम्यानही त्यांच्याशी आपुलकीने गप्पा मारत त्यांच्या हालचाली स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. विशेष व्यक्तींवर उपचार करताना डॉक्टर व परिचारिकांकडून कोणतीही तक्रार केली जात नाही. डॉक्टर व परिचारिकांकडून मिळत असलेल्या विशेष प्रेमाने मुलेही आनंदाने उपचार करून घेत असल्याची माहिती दंत भरणे आणि वाचिवणे विभागाचे प्रमुख डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी दिली. उपचारानंतर या रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य मनाला भावते. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य एक वेगळाच आनंद देऊन जाते. तसेच आपल्या रोजच्या कामातून काहीतरी वेगळे करायला मिळाल्याचा आनंद मिळतो. अशी भावना परिचारिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची सुटका, सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूल न देता शस्त्रक्रिया

दंत शस्त्रक्रिया करताना अनेक वेळा रुग्णांच्या हिरड्या व तोंडातील काही भागाला भूल देऊन सुन्न केला जातो. मात्र विशेष रुग्णांना भूल देणे धोकादायक असते. त्यामुळे भूल न देताच त्यांच्यावर उपचार केले जातात. परिणामी, उपचार करणे फारच अवघड असते. यावेळी रुग्णांच्या हालचालीमुळे काही समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचारासाठी विशेष कक्षामध्ये आपत्कालिन व्यवस्था करण्यात आली आहे.