लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करून त्याबाबत तक्रार केली होती. रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने या प्रकरणी चौकशी केली. तसेच, कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असून या प्रकरणाची चौकशी महापालिका मुख्यालय स्तरावरील ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई : गणेशोत्सवानंतर धारावीकर अदानीविरोधात रस्त्यावर उतरणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालिक डॉ. नीलम अंद्राडे यांनी या डॉक्टरची बदली नायर रुग्णालयातून केईएम रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने या सहयोगी प्राध्यापकाला शनिवारी निलंबित केले. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.