नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे बंद टीव्हीत आग लागून स्फ़ोट झाला. यावेळी घरात केवळ आठ वर्षांचा मुलगा होता. त्याने आरडारोरडा करून शेजाऱ्यांना बोलावले आणि नंतर आग विझववण्यात आली. तर जवळपास तासभरानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहचले.

नालासोपारा विजय नगर परिसरातील साईधाम इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या गोविंद विश्वकर्मा यांच्या घरात ही घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. गोविंद यांची पत्नी भाजीपाला आणण्यासाठी खाली गेली असता, त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते. यावेळी त्यांचा आठ वर्षाचा मुलगा घरात मोबाईलवर खेळत होता. दरम्यान, अचानक बंद टीव्हीतून धूर निघून आगीचा भडका उडाला. यावेळी या मुलाने बाल्कनीत जाऊन आराडा ओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून मुलाला सुखरूप बाहेर काढत आग विझवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेजाऱ्यांनी माहिती दिली की, वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाला फोन केला असता तब्बल एक तासाने त्यांची गाडी आली तोवर स्थानिकांनी आग विझवली होती. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून घराचा टीव्ही जळून खाक झाला.