शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले. अधिवेशनासाठी दिल्लीत असणारे राऊत ईडीने कारवाई केल्यानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागताला शेकडो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलं. मात्र याच स्वागतावरुन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> “…म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड** पहिल्यांदाच बघितले”; अपशब्द वापरत मनसे नेत्याचा राऊतांना टोला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?”, असा खोचक टोला राणेंनी ट्विटर तसेच फेसबुकवरील पोस्टमधून लगावलाय. “काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा?” असं राणेंनी विचारलं आहे. तसेच पोस्टच्या शेवटच्या ओळीत राणेंनी, “संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?” असंही सूचक वक्तव्य केलंय.

नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत दिल्लीत होते. याचदरम्यान संजय राऊतांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. खुद्द शरद पवारांनी देखील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांनी मुंबईत येताच भाजपाला आव्हान दिलं आहे. 

नक्की वाचा >> भाजपाने संजय राऊतांची कुख्यात गुंड गजा मारणेशी केली तुलना; म्हणाले, “तो सुटल्यानंतर…”

“:तुम्ही आमचं काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे. राजकीय विरोधक विचारानं सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्यासिवाय राहणार नाही”, असं संजय राऊत विमानतळावरुन बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane slams sanjay raut and shivsena over grand welcome of party mp scsg
First published on: 07-04-2022 at 19:33 IST