मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेची न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली व राणे यांना समन्स बजावून राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

राणेंसह त्यांच्या प्रचार कार्यकर्त्यांनी विजय मिळवण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप राऊत यांनी निवडणूक याचिकेद्वारे केला आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत केलेल्या राऊत यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी, एकलपीठाने राणे यांना समन्स बजावून त्यांना राऊत यांच्या याचिकेवर १२ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – झोपडीधारकांच्या दुर्दशेबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, काय म्हणाले?

हेही वाचा – मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीत राणे विजयी झाले. त्यांनी राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला. मात्र, निवडणुकीदरम्यानची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली. त्यात, राणे समर्थक मतदारांना पैसे वाटून राणे यांनाच मतदान करण्यास सांगत आहेत. या चित्रफितीची स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करावी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. त्यासह याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राणे यांना खासदार म्हणून काम करण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.