मुंबई : केंद्र सरकारने दिल्ली – मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून, हा महामार्ग मुंबईतील नरिमन पॉईंटशीही जोडण्यात येणार आहे. महामार्ग झाल्यास हा प्रवास बारा तासांत होईल, असे माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत वीजेवर धावणाऱ्या दुमजली वातानुकूलित बसला गुरुवारी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी दिल्ली-मुंबई महामार्गाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  या महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून वीजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस चालवण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. महामार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे. सध्या मुंबई-दिल्ली रस्ते मार्गे वाहनांना १ हजार ४५० किलोमीटर अंतर पार करावे लागते. यासाठी २४ तास लागतात. हा महामार्ग नरिमन पॉईंटशी जोडण्याचे नियोजन असून त्यामुळे येथूनही रस्तेमार्गे दिल्लीला बारा तासांत जाता येणे शक्य होईल. गेल्या काही वर्षांत वांद्रे-वरळी सागरी सेतू, ५५ उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे महामार्ग अशी अनेक कामे केली. मुंबई-दिल्ली महामार्ग नरिमन पॉईंट तसेच वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. दिल्ली-चंढीगड, दिल्ली-डेहराडून, दिल्ली-हरिद्वार आदी मार्गाचे काम सुरू असून त्यामुळे या शहरांतील प्रवास दोन तासांत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वीजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस ही मुंबईसाठी वेगळी व चांगली संकल्पना आहे. वाहतूक व्यवस्थेतील हे महत्त्वाचे परिवर्तन आहे, असे गडकरी म्हणाले.

पर्यायी इंधन : प्रदुषणमुक्तीसाठी वीजेवर धावणाऱ्या वाहनांकडे कल वाढत असतानाच भविष्यात वाहनांसाठी हायड्रोजन, इथेनॉल आदी पर्यायी इंधनाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे पेट्रोल, डिझेल हद्दपार होतील. पर्यायी इंधनांमुळे खर्च कमी होईल आणि वाढत्या प्रदुषणालाही रोखणे शक्य होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nariman point delhi travel twelve hours gadkari claim mumbai delhi expressway ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST