पृथ्वीभोवती सर्वाधिक काळ भ्रमण करणारी पहिली महिला बनण्याचा विक्रम ‘नासा’ची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या नावावर भलेही जमा असेल पण तब्बल ५० तास ४० मिनिटांची अंतराळ पदयात्रा एकाचवेळी करण्याचे भाग्य लाभलेल्या नासाच्या वीरांगनेचे अपुरे स्वप्न जर कोणते असेल तर ते आहे, संपूर्ण पृथ्वीचे विलोभनीय रूप ‘याची देही, याची डोळा’ साठवून ठेवण्याचे.
वरळीच्या ‘नेहरू विज्ञान केंद्रा’त आपल्या अंतराळ प्रवासाचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करताना सुनीताला तिच्या स्वप्नाविषयी विचारले असता तिने ही खंत बोलून दाखविली.
इतर ग्रहांच्या तुलनेत सुंदर असलेल्या या वसुंधरेचा मनोहारी संपूर्ण गोल एकाच वेळी पाहण्याचे भाग्य आजपावेतो मला लाभले नाही, अशी खंत तिने बोलून दाखविली. म्हणूनच भविष्यात चंद्रावरील मोहिमेत सहभागी होण्याची संधी लाभल्यास मला उत्कंठा असेल ती पृथ्वीचे दर्शन घेण्याची, अशी इच्छा तिने बोलून दाखविली.
आपल्या विक्रमाबद्दल इतरांना कौतुक वाटत असले तरी मला त्याविषयी दुराभिमान नाही. उलट तुमच्यापैकी कुणीतरी चांद्रमोहिमेत सहभागी होऊन ६० तासांची अंतराळ यात्रा करून माझा विक्रम मोडला तर मला त्यात आनंदच वाटेल, असे तिने उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून
सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’च्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आखण्यात आलेल्या ‘एक्स्पेडिशन-३३’ या अंतराळ मोहिमेची माहिती सुनीताने पॉवरपॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.
पाण्याचे तरंगणारे थेंब यानालाही हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे, दात घासणे, अंघोळ आदी वैयक्तिक स्वच्छतेची कामेही पाण्याअभावी कशी करायची याचे गंमतीदार चित्रण केल्याची माहिती यावेळी तिने
दिली.
अंतराळ संशोधनातून आपल्या अनेक दैनंदिन प्रश्नांवर तोडगा निघू शकतो. त्यामुळे, अंतराळ मोहिमांवर केला जाणारा खर्च वाया जाण्याचा सवालच येत नाही, असे तिने एका उत्तरात सांगितले. अंतराळ मोहिमांमध्ये भारताचा सक्रिय सहभाग असावा, असे मला निश्चितपणे वाटते. अंतराळ क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे असेल तर आपली सर्जनशीलाता ओळखा आणि त्या प्रमाणे पुढे जा, असा सल्ला तिने दिला.
पृथ्वीला अवकाशातून न्याहाळत असतानाही खंडांच्या, महासागरांच्या देशादेशांमध्ये सीमारेषा आपापसात वाटल्या गेल्या आहेत हे कुठेच मनात येत नाही. फक्त या अथांग विश्वासमोर आपण किती कणभर आहोत हेच प्रकर्षांने जाणवते, असे तिने सांगितले.
सर्वात भीतीदायक क्षण
अंतराळ स्थानकावरील सर्वात उंच भागावर जाऊन आम्हाला काम करायचे होते. तेव्हा तिथपर्यंतच्या पायऱ्या चढत असताना माझ्या पोटात अक्षरश: गोळा आला होता. पण, मी माझे डोळे बंद केले. शरीराची दिशा बदलली आणि पायऱ्या चढून गेले. हा अनुभव माझ्या आजवरच्या अनुभवातील सर्वात भीतीदायक क्षण होता.
अंतराळातून मुंबापुरी
अंतराळातून मुंबई कशी दिसते असे मला अनेकदा विचारले गेले आहे. माझ्याकडेही मुंबईचे असे छायाचित्र अगदी काल रात्रीपर्यंत नव्हते. गंमत म्हणजे रात्री झोपेत असताना अंतराळात भ्रमण करणाऱ्या एका मित्राने माझ्याशी संपर्क साधला. त्याला वाटले मी अमेरिकेत आहे आणि या वेळेस जागी असेन. मी मुंबईत असून झोपले आहे असे मी त्याला सांगितले. त्यावर तुझी मुंबई येथून कशी दिसते ते पाहायचे आहे का, असे विचारत मला चक्क अंतराळातून घेतलेले मुंबईचे छायाचित्रच सेलफोनवर पाठवून दिले. सध्या हे छायाचित्र माझ्या सेलफोनवर आहे.
आठवणीत साठवावा असा क्षण
एकदा मी सहजच ब्लॅक होलमधून (अवकाशयानाच्या खिडक्या) बाहेर डोकावत होते. त्यावेळेस मला सर्वत्र हिरवा प्रकाश दिसला. हा प्रकाश सतत हलत होता. ते दृश्य इतके अप्रतिम आणि स्वर्गीय होते की जणू आम्हाला विश्वाच्या गूढ ताकदीची चुणूकच त्यात दिसत होती. नंतर समजले की तो ‘ऑरा’ होता.