मुंबई : सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, लोकसंख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाण योग्य असावे यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्याची सूचना वैद्यकीय महाविद्यालयांना करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे देशभरातून ८७२ अर्ज करण्यात आले आहेत. या महाविद्यालयांना कागदपत्र सादर करण्याची सूचना ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.
देशातील आरोग्य सेवा सक्षम व बळकट करण्यासाठी, तसेच तळागाळातील प्रत्येक नागरिकाला अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र या सुविधा पुरविण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांना नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची किंवा जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्याची सूचना केली होती.
हेही वाचा…बॉडी मसाजासाठीची उपकरणे सेक्स टॉय नाहीत – उच्च न्यायालय
वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अर्जांवर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले होते. मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण देशातून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ८७२ अर्ज आले आहेत. या अर्जांमध्ये काहींनी जागा वाढविण्यासाठी, तर काहींनी नव्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज केले आहेत. ८७२ महाविद्यालयांमध्ये मंजूर होणाऱ्या नव्या जागांवर २०२४- २५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश आयोगाने ई-मेलद्वारे पाठविले आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ११ मार्च रोजी २३८, १२ मार्च रोजी २१४, १५ मार्च रोजी २०२ आणि २१ मार्च रोजी २१८ महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ई-मेलद्वारे पाठविले आहेत.