मुंबई : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ देशभरातील गुणवान विद्यार्थ्यांमधून अगदी निवडकांना नाट्यकलेेचे धडे गिरवण्याची संधी देणाऱ्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे (एनएसडी) पाऊल आता मुंबईतही पडले आहे. मनोरंजन क्षेत्राचे माहेरघर असलेल्या मुंबईत वर्षभराचा अभिनय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय ‘एनएसडी’ने घेतला आहे.
दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेतून शिकलेल्या अनेक गुणवान कलाकारांनी आज हिंदी, मराठी, गुजराती नाट्य-चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. दरवर्षी देशभरातून हजारो इच्छुक एनएसडीत प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत असतात. मात्र त्यापैकी केवळ ३३ विद्यार्थ्यांना एनएसडीत शिक्षण घेण्याची संधी मिळते. एनएसडीच्या या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. एनएसडीच्या दिल्लीतील मुख्य केंद्रासह सिक्कीम, बंगळूरु अशा पाच ठिकाणीही लघु अभ्यासक्रम घेतले जातात. मात्र ज्या मुंबईत पावणेदोनशे वर्षांची सशक्त नाट्यपरंपरा लाभलेली मराठी रंगभूमी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी रंगभूमी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे, तिथे एनएसडीचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. ‘एनएसडीची स्वत:ची नाट्यप्रशिक्षणाची एक कार्यपद्धत आहे. ६६ वर्ष अनेक दिग्गज रंगकर्मींचा अभ्यास, अनुभवातून एनएसडीचा अभ्यासक्रम विस्तारत गेला आहे. केवळ नाट्यप्रशिक्षणासाठी वाहिलेल्या एनएसडीसारख्या संस्थेकडून मिळणारे हे मौलिक शिक्षण देशभरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. त्याची सुरुवात मुंबईतून करतो आहोत. मुंबईत सध्या एनएसडीची जागा नाही. भाडेतत्त्वावर जागा घेऊन हा वर्षभराचा अभिनय प्रशिक्षणवर्ग सुरू करतो आहोत. त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन या प्रशिक्षणवर्गासाठी निश्चित असे शुल्क आकारण्यात येणार आहे’ अशी माहिती एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी दिली.
एनएसडीच्या प्रशिक्षणवर्गाचे स्वरूप
एनएसडीने त्यांच्या फेसबुक पेजवर या नव्या अभिनय प्रशिक्षणवर्गाची माहिती दिली. १५ ऑक्टोबरपासून अंधेरी पश्चिम येथे हा प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहे. वर्षभराच्या या प्रशिक्षण वर्गाचे एकूण शुल्क ५ लाख रुपये आहे. तर सहा महिन्यांच्या दोन सत्रांत हा अभ्यासक्रम करायचा असल्यास प्रत्येकी ३ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी इच्छुकांना प्रवेशअर्ज भरण्याचे आवाहनही एनएसडीच्या वतीने करण्यात आले आहे. शुल्क आकारून प्रशिक्षण देणारा हा एनएसडीचा पहिलाच अभ्यासक्रम आहे.
प्रशिक्षण वर्गाबद्दल मिश्र प्रतिक्रिया
एनएसडीचा अभ्यासक्रम पहिल्यांदाच मुंबईत सुरू होत असल्याने माजी विद्यार्थी, कलाकार, रंगकर्मी यांनी आनंद व्यक्त केला. मात्र या वर्षभराच्या प्रशिक्षण वर्गासाठी ५ ते ६ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याबद्दल अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दिल्लीतील एनएसडीत तीन वर्षांचा अभ्यासक्रम सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर सुरू असल्याने गेली अनेक वर्ष निम्न आर्थिक स्तरातून आलेल्या गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळाली आणि उत्तमोत्तम कलाकार आजवर घडले आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले गेल्यास फार कमीजणांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचू शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
मुंबईत खरोखरच एनएसडीसारख्या सर्वोत्तम संस्थेने अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. इथे नाट्यशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवाजनांची संख्या मोठी आहे. दरवर्षी देशभरातून फक्त तीसएक मुलांना नाट्यशिक्षण घेता येत होते, हे बदलणे कुठेतरी आजच्या काळाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र ज्या पध्दतीने घाईघाईत इतके शुल्क आकारून हा अभ्यासवर्ग जाहीर केला आहे ते पाहता ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यांच्यापर्यंतच या अभ्यासक्रमाचा लाभ पोहोचणार. सरकार दरवर्षी एनएसडीच्या अभ्यासक्रमासाठी इतका खर्च करते, मात्र तिथून प्रशिक्षण घेतलेले कलाकार नाट्यक्षेत्राऐवजी चित्रपट क्षेत्रात रमले आहेत. मग त्या अभ्यासक्रमाचा नाट्यक्षेत्राला नेमका फायदा कसा होणार? याचाही विचार व्हायला हवा. – मकरंद देशपांडे, अभिनेता-दिग्दर्शक