मुंबई : खोटी कागदपत्रे, सरकारची फसवणूक केल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून जाहीर करूनही केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी म्हणून राज्यातील भाजपचा एक बडा नेता प्रयत्नशील असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केला.

तसेच आपल्या जावयाला अडकविण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने पंचावर कसा दबाव टाकला याची ध्वनिफीतच मलिक यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. मलिक यांच्या जावयाला गेल्या वर्षी अमली पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आपण समीर वानखेडे व अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर व त्यांची प्रकरणे पुराव्यानिशी जाहीर केल्याने आता जावयाला पुन्हा अडकविण्यासाठी समीर वानखेडे यांनी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक यांच्या जावयाचा जामीन रद्द करावा म्हणून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक यांनी सादर केलेल्या ध्वनिफितीनुसार, किरणबाबू नावाचा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला दुरध्वनी करीत जुन्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी बोलावीत होता. तसेच आपल्यासमोर अमली पदार्थ पकडल्याचा जबाब द्यावा म्हणून सांगत असल्याचे संभाषण यात आहे. तसेच समीर वानखेडे आणि त्या पंचाचे संभाषणही मलिक यांनी ऐकविले.