केवळ मराठाच नव्हे तर आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांमध्ये मग अगदी ब्राह्मण समाजातील असल्यास त्यालाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर सावध भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षण हा राज्याच्या राजकारणातील संवेदनशील विषय ठरला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचे नेहमीच समर्थन केले आहे. मात्र त्याचा फटका गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला होता. अनुसूचित जाती व जमाती, भटके विमुक्त किंवा इतर मागासवर्गीय यांच्या आरक्षणाला धक्का न लावता समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागासांना आरक्षण दिले जावे, अशी पक्षाची भूमिका कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. आर्थिकदृष्टय़ा मागासांमध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश असावा, असेही धोरण राष्ट्रवादीने घेतले आहे.
पराभूत जागांचीच अदलाबदल
आघाडीत २६ आणि २२ जागांचे सूत्र ठरल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला. मात्र असे कोणतेही सूत्र ठरलेले नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितल्याकडे लक्ष वेधले असता, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष पवार यांनी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत काय ठरले याची माहिती आम्हाला दिली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना ती माहिती दिली नसावी, असा टोला जाधव यांनी हाणला. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पण निवडून येणे शक्य नसलेल्या किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या आणि विरोधी उमेदवाराला विजयी करणाऱ्या जागांची अदलाबदल केली जावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
पक्षाची नवी छोटी कार्यकारिणी
प्रदेशाध्यक्ष जाधव आणि कार्याध्यक्ष आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ४१ पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली. त्यात गुजराथी समाजाला स्थान देण्यात आले नसल्याची तक्रार त्या समाजाने केली. महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचा आग्रह पक्षाध्यक्ष पवार हे धरतात, पण नव्या कार्यकारिणीत फक्त दोन महिलाच आहेत. मदन बाफना, संजय खोडके, विजय कांबळे, डॉ. गजाजन देसाई, दिनकर तावडे आदींचा फेरसमावेश करण्यात आला आहे.