कलिना व अंधेरी येथील भूखंडांचा विकास तसेच महाराष्ट्र सदनाचे बांधकाम हे सारे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने घेतले होते. या साऱ्याला एकटे छगन भुजबळ जबाबदार कसे, असा सवाल करीत काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर घोटाळा प्रकरणाचे खापर फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यापासून राष्ट्रवादीने या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. भुजबळ यांच्या विरोधात राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. भुजबळ यांच्या मालमत्तांवर धाडी पडल्यावर मात्र राष्ट्रवादीच्या वतीने भुजबळ यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न झाला. भुजबळ यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. या संदर्भात भुजबळ कायदेशीर लढाई करतील. खारघर येथील निवासी संकुलाच्या कामाला विलंब झाल्याबद्दल भुजबळ कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईत हजारो बिल्डरांकडून सदनिका खरेदीदारांची फसवणूक केली जाते. पण किती विकासकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, असा सवालही मलिक यांनी केला.
कलिना येथील ग्रंथालयाचा भूखंड तसेच महाराष्ट्र सदनाचे बांधकाम यावरून भुजबळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पण हे सारे निर्णय एकटय़ा भुजबळ यांनी घेतले नव्हते. आर.टी.ओ. भूखंड विकासाचा निर्णय हा परिवहन खात्याचा होता. हे खाते कधीच भुजबळ यांच्याकडे नव्हते. त्या खात्याच्या तत्कालीन मंत्र्याने हा प्रस्ताव तयार केला होता, असेही मलिक यांनी सांगितले. आघाडी सरकारात परिवहन खाते काँग्रेसकडे होते. अंधेरी येथील भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा निर्णय प्राधिकरणाचा होता व गृहनिर्माण खाते काँग्रेसकडे होते अशी सफाई देत त्याचे खापर काँग्रेसच्या मंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.
कलिना तसेच महाराष्ट्र सदन बांधकामांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली होती. खात्यांकडून प्रथम प्रस्ताव येतो. त्यावर सचिवांच्या समितीकडून छाननी केली जाते. मग मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेनंतरच हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीत जातो. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता एकटे भुजबळ कसे काय दोषी ठरतात, असा सवाल करीत मलिक यांनी या घोटाळ्यात काँग्रेसचाही संबंध असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.