Mumbai Mahamorcha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी दिला. आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं लोक येथे आले आहेत. आज ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत, ती लोक महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत.”

Chhagan Bhujbal On Mahayuti Seat Sharing
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार? छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले, “महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा…”
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Archana Patil joins NCP
अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमधून उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांशी लढत

“स्वातंत्र्य भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली, पण मागील साडेतिनशे वर्षांपासून सामान्य माणसांच्या अंतकरणावर एकच नाव अखंड आहे, ते नाव म्हणजे हिंदवी स्वाराज्याची स्थापना करणारे ‘शिवछत्रपती’. अशा शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख राज्याचा एखादा मंत्री करतो, अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटकपक्ष करतात. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ही भावना तीव्र करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तुम्ही इथे आला आहात. यातून राजकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. याबद्दलची खात्री मला स्वत:ला आहे,” असा इशारा शरद पवारांनी दिला.

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांची ताकद पाचपखाडी अन्…”, ठाणे बंदवरून राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, “यांच्या डोक्यातील गांडूळाचा मेंदू वळवळत असतो”

पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वजण आपल्या सन्मानाची आणि आदराची स्थानं आहेत. पण आजचे राजकर्ते या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली, या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. या लोकांनी महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. पण यावेळी अशी एक व्यक्ती याठिकाणी आली आहे. जी महाराष्ट्राच्या एकंदरीत विचारधारेला संकटात नेण्याचं काम करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी बाष्कळ उद्गार काढले आहेत. त्यांना शरम वाटली पाहिजे.”

हेही वाचा- फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शिंदे-फडणवीस सरकारबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

“महात्मा फुलेंनी सर्वसामान्य माणसाला संघटित करण्यासाठी, आधुनिक विचार देण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि ज्ञानदानाचं काम केलं. अशा सामाजिक कामासाठी पुढाकार घेणारा एक थोर नेता म्हणून महात्मा फुलेंना संपूर्ण देशात ओळखलं जातं. मी जेव्हा बिहार, उत्तरप्रदेश किंवा इतर काही ठिकाणी जातो, तिथेही महात्मा फुलेंचं नाव आदराने घेतलं जातं. अशा नेत्याबद्दल राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर त्यांना राज्यपाल पदावर बसण्याचा अधिकार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने मी केंद्र सरकारला संदेश देतो की, राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. आज लोक शांततेत आहेत. पण तुम्ही ही हकालपट्टी वेळेत केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशारा शरद पवारांनी मोदी सरकारला दिला.