४० हजार कोटींच्या सुधारित मान्यतेवरून प्रश्नचिन्ह

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच टीकेचे लक्ष्य होत असतानाच आता राष्ट्रवादीने भाजपवर सिंचन खात्यातील वाढीव खर्चावरून पलटवार केला आहे. गेल्या तीन वर्षांत ४० हजार कोटींच्या वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली. हा खर्च का वाढविण्यात आला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावरून राष्ट्रवादीला बदनाम करण्यात आले. भाजप सरकारच्या काळातही सिंचनाचे पाणी मुरल्याचा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. राष्ट्रवादीकडे सिंचन खाते असताना दिलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेवरून भाजपने आकाश-पाताळ एक केले होते. पण सत्तेत आल्यावर भाजपने वेगळे काय केले, असा सवालही मलिक यांनी केला.

‘भाजपच्या समृद्धीसाठीच मोपलवार’

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून भाजप नेत्यांची ‘समृद्धी’ करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हे सारे बिनबोभाटपणे पार पाडण्यासाठीच वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी फेरनियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला.