भाजप-राष्ट्रवादीची जवळीक वाढली, शिवसेना एकाकी

विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील चर्चेचा सूर वेगळाच निघाला. कर्जमाफीचा निर्णय युती सरकारचा असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र शिवसेनेलाच टीकेचे लक्ष्य केले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने तर समाधान व्यक्त करीत राष्ट्रवादीने त्यांचे ‘अंशत:’ आणि ‘तत्त्वत:’ अभिनंदनही केले. भाजप व राष्ट्रवादी यांच्यात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असे वातावरण होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीच्या जवळकीत शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने  ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात सत्ताधारी सदस्यांनी चर्चेसाठी प्रस्ताव मांडला होता. त्याला अभिनंदन प्रस्ताव असे म्हटले जात होते. गेले दोन दिवस या प्रस्तावावर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चर्चा केली. पहिल्या दिवशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारची कर्जमाफीची योजना फसवी, दिशाभूल करणारी आहे, अशा आरोपाच्या फैरी झाडल्या. काँग्रेसच्या वतीने सतेज पाटील व भाई जगताप यांनी, अनेक उदाहरणे देऊन कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नाही, उलट त्यांची कटकट वाढविणारी आहे, अशी टीकेची झोड उठविली.

या चर्चेवरील मुख्यमंत्र्यांच्या उत्तराच्या आधी आणि नंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर बदलला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी स्वत:च्या सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेला कोपरखळ्या हाणण्याचा प्रयत्न केला. सरकार दळभद्री, नालायक आहे, अशी टीका करणाऱ्या शिवसेनेला मग तुम्ही कोण आहात, असा प्रश्न विचारला. कर्जमाफीची घोषणा केली, निर्णय घेतला, परंतु त्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सांगून तटकरे यांनी भाजपबाबत सबुरीचा सूर लावला. आता आम्ही आपले अंशत: व तत्त्वत: अभिनंदन करतो, मात्र ३१ डिसेंबरच्या आत प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी आमच्या वतीने  मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडू, अशी हमीही तटकरे यांनी दिली.

कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी फक्त २० हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. अजून १४ हजार कोटींचा प्रश्न आहे. एकदम सर्व प्रश्न सुटणार नाहीत. परंतु मुंबई महापालिकेचे ६० हजार कोटी रुपये बँकेत ठेव म्हणून जमा आहेत. त्यातील ३० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी द्यावे, अशी मागणी करून सुनील तटकरे यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

या प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, सीमेवर आपले संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या शेतकरी कुटुंबांचे, तसेच शेतकरी पती-पत्नींचे स्वतंत्र कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मागासवर्गीय महामंडळे, मच्छीमार, बारा बलुतेदारांची लहानलहान व्यवसायांची कर्जे माफ करावी, या तटकरे यांच्या मागणीचीही नोंद घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेनेचे अ‍ॅड. अनिल परब व डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांच्या ऐवजी एक लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी आणि ३१ मार्च २०१७ पर्यंतची कर्जे माफ करावीत, अशी मागणी केली होती, परंतु त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.