भाजप-शिवसेना महायुतीचे मेळावे सुरू झाले तरी आघाडीत जागावाटपाच्या चर्चेला मुहुर्त मिळत नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचा राग काँग्रेसकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर काहीसा मावळला आहे. जागावाटपावर दहा दिवसांमध्ये तोडगा निघेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीत आतापर्यंत सारे निर्णय राष्ट्रवादीला अनुकूल असे व्हायचे. २००९ मध्ये काँग्रेसचे २० आमदार जास्त निवडून आले तरीही खातेवाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला होता. महाराष्ट्रातील सत्ता टिकवून ठेवण्याकरिता राष्ट्रवादीपुढे काँग्रेसने नेहमीच पडती भूमिका घेतली होती. काँग्रेसने यंदा मात्र राष्ट्रवादीला तंगवले. काँग्रेसने २६-२२ चे नेहमीचे सूत्र बदलले पाहिजे, अशी भूमिका मांडली. तेव्हापासून द्विपक्षांत धुसफूस सुरू झाली. अखेर शरद पवार यांनी रविवारी घेतलेल्या भूमिकेवरून आघाडीतील बिघाडी तात्पुरती संपली असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची झालेली भेट तसेच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्याशी केलेली चर्चा यातून वातावरण निवळले. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला चांगलेच ताटकळत ठेवले. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलेले मोदी प्रेम किंवा शरद पवार यांनी यूपीए पुन्हा निवडून येण्याबाबत व्यक्त केलेली साशंकता यातून राष्ट्रवादी वेगळा विचार करीत असल्याचा संदेश बाहेर गेला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही इशारे दिले तरीही लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी वेगळा विचार करणार हे पक्के ठाऊक असल्यानेच काँग्रेसनेही थोडे दमाने घेतले.
आघाडीबाबत राष्ट्रवादीने काँग्रेसवर कोणतीही मुदत लादलेली नाही. जागावाटपाची चर्चा होऊन दहा दिवसांमध्ये हा तिढा सुटेल, असे शरद पवार यांनी व्टिटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल किंवा भास्कर जाधव यांनी टोकाची भूमिका घेतली होती. यशाबरोबरच अपयशाचा धन कर्णधार असतो, असे विधान करून जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अपयश आल्यास त्याला काँग्रेस जबाबदार राहिल, असेच अप्रत्यक्षपणे सूचित केले. मात्र शरद पवार यांनी रविवारी घेतलेल्या भूमिकेवरून आघाडीतील बिघाडी चर्चेच्या फेऱ्या पार पडेपर्यंत संपली असल्याचे स्पष्ट झाले.
उभयतांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादीने २६-२२ या सूत्रानुसार जागावाटप झाले पाहिजे, असा आग्रह गेल्या एप्रिलपासून धरला आहे. काँग्रेसला मात्र हे जागावाटपाचे सूत्र मान्य नाही. काँग्रेस २९ तर राष्ट्रवादी १९ असे सूत्र काँग्रेसने मांडले होते. राष्ट्रवादीने त्याला नकार दिला. आता काँग्रेसने २७-२१ जागावाटपाचे सूत्र ठरावे, असा प्रस्ताव माडंला आहे. राष्ट्रवादीचे सूत्र (२६-२२) मान्य केले तर काँग्रेसने राष्ट्रवादीची दादागिरी मान्य केल्यासारखे होईल. तर काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सूत्र मान्य केल्यास राष्ट्रवादीने नमते घेतले हा संदेश जाईल. परिणामी दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा आता कोणी किती जागा लढवायच्या याचे संख्याबळ ठरविाताना पणाला लागणार आहे.