दुसऱ्या टप्प्यात चांगल्या कामगिरीचे आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर या वर्चस्व क्षेत्रांमध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये धक्का बसल्याने आता पुणे जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी लागणार आहे. पुणे जिल्ह्य़ात फटका बसल्यास राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का असेल.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा गेल्या वर्षी पराभव झाला. विधान परिषदेच्या सातारा-सांगली आणि सोलापूर या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ या दोन बालेकिल्ल्यातील मतदारसंघात पराभव झाला. अलीकडेच नगरपालिका निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मर्यादित यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात एकापाठोपाठ एक गड ढासळू लागले आहेत. नगरपालिका निवडणुकीत सोलापूरमध्ये दारुण पराभव झाला. कोल्हापूर, सांगली, नगरमध्येही फटका बसला. या पाश्र्वभूमीवर १४ डिसेंबरला होणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील दहा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने भाजपची हवा झाली आहे. याचा निश्चितच परिणाम राष्ट्रवादी व अन्य पक्षांवर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्य़ात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. २१ पैकी राष्ट्रवादीचे फक्त तीन आमदार निवडून आले होते. पुणे जिल्ह्य़ात नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यास त्याची पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. यामुळेच राष्ट्रवादीचे नेते सावध झाले असणार.

बारामती हा पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. बारामतीमध्ये पवारांना झटका देण्याकरिता विरोधक एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार पोटे यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सभा घेणार असल्याची चर्चा आहे. बारामतीची निवडणूक ही अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीवने केलेला पराभव फारच जिव्हारी लागल्याने यंदा हर्षवर्धन हे तयारीनिशी उतरले आहेत. याचाच भाग म्हणून फक्त एकाचा अपवाग वगळता साऱ्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तळेगाव-दाभाडे आणि आळंदीमध्ये भाजप चांगली कामगिरी करेल, अशी शक्यता आहे. शिरुरमध्ये धारिवाल यांच्या आघाडीला आव्हान आहे. दौंम्डमध्ये आमदार राहुल कूल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सासडवड, जुन्नर या पालिकांमध्ये शिवसेनेची हवा आहे.

राष्ट्रवादीला रोखण्याकरिता भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधकांमध्ये पडद्याआडून गुप्त समझोतेही काही ठिकाणी करण्यात आल्याचे बोलले जाते. पुणे गमाविल्यास राष्ट्रवादीला गळती लागू शकते. यामुळेच अजित पवार हे सहजासहजी घेणार नाहीत. यामुळेच पुणे जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांवर साऱ्यांचे लक्ष असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp in pune election
First published on: 02-12-2016 at 01:19 IST