शिवसेना-भाजप युतीने मोफत वीज देण्याची घोषणा करताच लोकशाही आघाडीने शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन युतीच्या घोषणेतील हवा काढली होती. आता मनसेने टोलच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताच, दुपदरी रस्ते आणि पुलांवरील टोल रद्द करण्याची मागणी आतापर्यंत टोल वसुलीचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीनेच केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय अपेक्षित असताना त्याचे श्रेय घेण्याकरिताच राष्ट्रवादीने मागणी रेटल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.  
टोलच्या विरोधात राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू करताच टोल वसुली कशी आवश्यक आहे, याचे दाखले राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिले जात होते. सार्वजनिक बांधकाम खाते छगन भुजबळ यांच्याकडे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ राष्ट्रवादीचेच जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची मागणी होताच राष्ट्रवादीकडे असलेल्या रस्ते विकास मंडळाने टोलची आवश्यकता सांगण्यावरच भर दिला होता. टोलचे आतापर्यंत सर्वात जास्त समर्थन राष्ट्रवादीकडून केले जात असतानाच टोल वरून निर्माण झालेल्या विरोधी वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने कोलांटउडी घेतली आहे. राज्यातील दुपदरी रस्ते आणि पुलांवर आकारण्यात येणारा टोल रद्द करण्याची मागणी करणारे पत्रच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
काँग्रेसकडूनही तक्रार
मुंबईतून नवी मुंबईत जाताना टोल नाका पार करताच  रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, याकडे काँग्रेसचे  प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच टोल नाक्यांवरी कर्मचारी वाहनचालकांशी उद्धटपणे वागतात, असा तक्रारींचा सूरही गाडगीळ यांनी लावला आहे.