पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजपची नाराजी ओढवून घेतलेले साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना देण्यात येणाऱ्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने चिंता व्यक्त केली असून, सनातन संघटनेच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
सकाळी फिरायला जात जा, असा सल्ला सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी सबनीस यांना दिला आहे.
नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची सकाळी फिरालया गेले असतानाच हत्या करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर पुनाळेकर यांच्या ट्विटला महत्त्व प्राप्त होते, असा आक्षेप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घेतला आहे.
सनातन संघटनेचे कायदेशीर सल्लागार पुनाळेकर यांच्या विरोधात कारवाईची मागणी मलिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येमागे सनातनचा हात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी सनातनच्या कार्यकर्त्यांला अटक झाली आहे. मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून सबनीस यांना देण्यात येणाऱ्या धमक्यांवरून भाजप आणि सनातन एकाच माळेचे मणी असल्याचे सिद्ध होते, अशी टीकाही मलिक यांनी केली.