मुंबई : ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांचा संबंध काय आहे? कौटुंबिक मित्र असलेल्या फ्लेचर पटेल यांना तीन खटल्यात पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

 फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचे कौटुंबिक मित्र आहे असे समाजमाध्यमांवरील छायाचित्रांवरून दिसून येते. तो समीर वानखेडेंच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन असे उल्लेख असलेले त्यांचेही फोटो टाकले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

मागच्या वर्षी २५ नोव्हेंबरला एनसीबीने छापा टाकला त्यात फ्लेचर पटेल हे अनोळखी पंच करण्यात आले. त्यानंतर  ९ डिसेंबरला एका शोध मोहिमेत  फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरे प्रकरण २ जानेवारीचे असून त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल तटस्थ पंच आहेत असे सांगता मग ते तुमचे कौटुंबिक मित्र कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केलीय का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला. तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे कुठलं रॅकेट मुंबईत सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करतोय. हे सगळे लोक बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचं काम करत आहेत का?, असा सवालही नवाब मलिक यांनी केला.