राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गांधी जयंतीदिनी ग्रामसभा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला. त्या गांधीजींच्या जयंतीदिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून गांधी विचारांना संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. तसेच सरकारच्या निर्णयाची प्रत ट्विटरवर शेअर करत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, सततच्या होणाऱ्या ग्रामसभांमुळे ग्रामस्थांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

ग्राम विकास विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार घ्यावयाच्या चार ग्रामसभां व्यतिरिक्त राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या महत्वाच्या योजना किंवा फ्लॅगशिप कार्यक्रमांच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेण्याबाबतच्या सूचना आयत्यावेळी जिल्हा परिषदांना देण्यात येतात. त्यामुळे अशा अचानक होणाऱ्या ग्रामसभांमुळे वर्षभरातील ग्रामसभांची सरासरी संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा सततच्या होणाऱ्या ग्रामसभांना ग्रामस्थांचा अल्प प्रतिसाद मिळतो व ग्रामसभा आयोजित करण्याचे औचित्य साध्य होत नसल्याचे त्यात म्हटले आहे.