राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. तर दुसरीकडे जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात, एका मागावर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयेत म्हणता अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
‘समीर दाऊद वानखेडे’, जन्म प्रमाणपत्र शेअर करत नवाब मलिकांचा पुन्हा हल्ला




“गेले १४ ते १५ दिवस किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, मालदीवचा दौरा या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर कोणताही खुलासा करत नाहीत. राजकीय आरोप आहे असं त्यांचं म्हणणं होतं, व्यक्तीगत आरोप करत आहेत असं म्हणत होते. पण काल ज्या पद्दतीने खुलासा झाला आहे त्यातून मी सत्य बोलत होतो हे समोर आलं आहे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
जन्मदाखल्यात खाडाखोड करण्यात आली
“भाजपाकडून हिंदू-मुस्लिम मुद्दा काढला जात होता. वानखेडे हे समीर दाऊद वानखेडे आहेत. जन्मापासून आजपर्यंत ते मुस्लिमच आहेत. त्याचा जन्मदाखला मी प्रसिद्ध केला आहे. यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्या बहिणीच्या दाखल्यात के वानखेडे शब्द वापरला आहे. हे दाऊद वानखेडे ज्यांनी धर्मांतर केल्यानंतर नाव बदललं होतं त्याच्या आधारे जन्मदाखला काढण्यात आला. नंतर त्याच्यात खाडाखोड करण्यात आली आणि त्यातून बोगसगिरी सुरु झाली आहे. मी अजून काही कागदपत्रं समोर आणणार आहे,” असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
“पहचान कौन”, नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला फोटो?
बोगस प्रमाणपत्र काढून आयआरएसची नोकरी घेतली
“समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्र काढून आयआरएसची नोकरी घेतली आहे. त्यांचा काळा अध्याय जनतेसमोर आणणार आहे. हा बोगस माणूस असून त्याची बोगसगिरी सुरु आहे. बोगस केसेस करत असून दहशत निर्माण करत आहेत. पैसे गोळा करत असून मुंबईतून शेकडो कोटी वसूल करण्यात आले आहेत. आज ना उद्या हे सगळं समोर येणार आहे,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
पहिल्या पत्नीच्या फेसबुकवर फोटो
दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटरला शेअर करण्यात आलेल्या पहिल्या लग्नाच्या फोटोसंबंधी विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणालेकी, “७ डिसेंबर २००६ साली लग्न झालं तेव्हा रिसेप्शन झालं. हा फोटो त्यादिवशीचा आहे. ज्यांना सोडचिठ्ठी दिली त्या पत्नीच्या फेसबुकवर हा फोटो आहे”. समीर वानखेडे यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
पहिल्या पत्नीपासून एक मुलगा
“या फोटोला का घाबरत आहात? सोडचिठ्टी दिलीये त्यांनीच हा फोटो फेसबुकवर ठेवला आहे. तुमचा मुलगा कुठे शिकतो? त्याचं नाव काय? धर्म काय? याचेही पुरावे आहेत. तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात. एका मागावर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयेत म्हणता,” अशा शब्दांत नवाब मलिक यांनी जाब विचारला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी पहिल्या पत्नीशी काही बोलणं झालेलं नाही. काही लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आमची लांबची एक बहिण आहे, त्यांची मुलगी ज्या घऱात आहे तिच्याशी नातं आहे अशी माहिती दिली.
समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीम
“समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीम आहेत. आजदेखील आहेत आणि कालपण होते.एका मशिदीत जाऊन ते भाषण करत आहेत. एखाद्या मौलानापेक्षा जास्त धार्मिक विषय ते सांगत आहेत. नोकरीसाठी बोगस दाखला काढून त्यांनी नोकरी घेतली आहे. बोगसगिरीतून ते निर्माण झाले आहेत,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
पत्नीच्या कंपनीत बिल्डरची गुंतवणूक
“जी नवीन पत्नी आहे त्यांच्या कंपनीत कोणत्या बिल्डरची गुंतवणूक आहे. कोणत्या माध्यमातून हवाला रॅकेटने हे पेसे पाठवत आहेत ही माहिती आज ना उद्या लोकांसमोर येईल,” असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.