राज्यातील सत्तास्थापनेबद्दल शिवसेना आणि भाजपातील चर्चा १३ दिवसानंतरही होती तिथेच थांबली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं. त्यावरूनही उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेवरून गोंधळ सुरू असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी पवार यांनी अमित शाह यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या पोलीस आणि वकिलांच्या वादाबद्दल मत व्यक्त केलं. दिल्लीतील पोलिसांचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळं केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही ते बोलले. राज्यातील राजकारणाविषयी फारसं काही बोलण्यासारखं नाही. शिवसेना आणि भाजपा यांची २५ वर्षांची युती आहे. आम्हाला जनतेने कौल दिलेला नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला महाराष्ट्रात बसायचं आहे कारण जनतेने सत्तेचा कौल युतीला दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि हा पेच संपवावा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शिवसेना खासदार संजय राऊत यांची शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा

मागच्या काही काळात अनेक राज्यात बहुमत नसतानाही अमित शाह यांनी सत्ता स्थापन केली, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी पवार यांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “असं आहे, त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहत आहोत. त्यांनी सरकार बनवावं,” असं खास पवार शैलीतलं उत्तर त्यांनी दिलं. “संख्याबळ असतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केलं असतं. तसं ते झालेलं नाही, लोकांनी त्यांचा निर्णय दिला आहे. आता भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं आणि आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.