नेहरूनगर पोलीस ठाण्यातील लाचखोरी :

अनधिकृत बांधकामांसाठी लाच मागितल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना धमकावत असल्याचा आरोप या प्रकरणाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करणारे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद कासीम खान यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केला. याचिकेतील या आरोपांबाबत खुद्द पोलीस आयुक्तांनी उत्तर दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केले.

खान यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर मोठी खळबळ माजली आणि संपूर्ण पोलीस ठाणे भ्रष्टाचारी असल्याचे जाहीर होऊन वरिष्ठ निरीक्षक धनंजय बागाईतकर यांच्यासह ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तर तपास अद्याप पुढे सरकलेला नाही, असा आरोप खान यांनी केला. तसेच त्यामुळे प्रकरणाचा तपास ‘एसआयटी’कडून करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे आपल्याला व आपल्या कुटुंबियांना या प्रकरणातील लाचखोर पोलिसांकडून धमकावण्यात येत असल्याने संरक्षण देण्याची मागणीही केली.

खान यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने पोलीस आयुक्तांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देत याचिकादार आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश दिले.