सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असले तरी राष्ट्रवादी तीन ते चार मंत्र्यांना घरी पाठवून नव्या चेहऱ्यांना संधी देईल, अशी अटकळ बांधली जात आह़े  तरी कोणाची विकेट जाणार यावरून राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने सारेच गोंधळलेले होते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मंगळवारी विस्तार करण्यात येणार असला तरी काँग्रेस या दिवशी मंत्र्यांमध्ये फेरबदल करणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जातो. राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारण्यावर पवार यांनी भर दिल्यास विविध आरोप झालेले छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव देवकर यांच्यावर गंडांतर येऊ शकते. तरुण वर्गाकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले. आर. आर. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे गेली दोन वर्षे मंत्रिपदासाठी प्रतिक्षेत असलेल्यांचा या वेळी समावेश होण्याची शक्यता आहे.   

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची सारी सूत्रे शरद पवार यांनी हाती घेतली आहेत. मंत्र्यांच्या राजीनाम्याचे धक्कातंत्र अवलंबून शरद पवार यांनी योग्य तो संदेश दिला आहे. कोणाला वगळायचे वा कोणाला संधी द्यायची याचा सारा निर्णय हा स्वत: पवार हे घेणार आहेत. यामुळे पक्षाचे सारेच नेते अस्वस्थ आहेत. पक्षाच्या मंत्र्यांचा शपथविधी मंगळवारी केला जावा, असे राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे. तीन ते चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे.

काँग्रेसचा विस्तार नंतर करणार – मुख्यमंत्री
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मंगळवारी विस्तार केला जाणार असला तरी काँग्रेसच्या मंत्र्यांचा त्याच दिवशी विस्तार होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. पवार यांनी आपल्याकडे महिन्याभरापूर्वीच विस्ताराची कल्पना मांडली होती. यवतमाळच्या पोटनिवणडणुकीनंतर विस्तार करावा, असे आपण त्यांना कळविले होते. काँग्रेसमध्येही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही बदल करावे लागणार आहेत. मात्र या बदलांबाात आपली पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा झालेली नाही. पक्षाला उपयुक्त ठरतील अशा नव्या चेहऱ्यांना संधी देताना काही जणांना वगळण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. राष्ट्रवादीच्या राजीनामानाटय़ानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचा विस्तार केल्यास राष्ट्रवादीच्या दबावाला काँग्रेस झुकले, असा संदेश जाणे हे काँग्रेसला सोयीस्कर ठरणार नाही. मात्र, पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.