१२ मजूर जखमी; पोलिसांकडून बांधकामाबाबत शंका उपस्थित
वडाळा येथील लोढा बिल्डरच्या न्यू कफ परेड या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वाहनतळाचा स्लॅब कोसळून १२ कामगार जखमी झाले. त्यातील एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. रविवार संध्याकाळी ही दुर्घटना घडली.
वडाळा येथील आणिक बस आगाराजवळ लोढा बिल्डरतर्फे न्यू कफ परेड नावाचे संकुल उभारणीचे काम सुरू आहे. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहनतळाच्या पाच मजली इमारतीच्या स्लॅबचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत १२ कामगार जखमी झाले. त्यापैकी नऊ जणांवर सायनच्या चिन्मय रुग्णालयात, तर तीन जणांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत माहिती देताना वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांनी सांगितले की, लोढा बिल्डरने बांधकामाचे कंत्राट अल फरा या कंपनीला दिले होते. आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. वाहनतळ (पार्किंग) इमारत ज्या साहित्याने आणि आराखडय़ाने बांधली त्याच साहित्याने निवासी इमारत बांधली असेल तर त्यालाही धोका उत्पन्न होऊ शकेल, अशी भीतीही गरुड यांनी व्यक्त केली.
न्यू कफ परेड या नव्याने विकसित होत असलेल्या निवासी संकुलात आलिशान सदनिका बांधण्यात आल्या असून, त्यांचा मुंबईतल्या महागडय़ा सदनिकांत समावेश होतो.