scorecardresearch

नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान नवीन उड्डाणपूल? ; लोकप्रतिनिधी-रहिवाशांची एमएमआरडीएकडे मागणी

नरिमन पॉईंट – कुलाब्यादरम्यानचे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येथे उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान नवीन उड्डाणपूल? ; लोकप्रतिनिधी-रहिवाशांची एमएमआरडीएकडे मागणी
नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान नवीन उड्डाणपूल

नरिमन पॉईंट – कुलाब्यादरम्यानचे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येथे उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भविष्यात या परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता याव्यतिरिक्त नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोड (साधू वासवानी रोड)दरम्यान आणखी एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली आहे. या उड्डाणपुलाबाबत व्यवहार्यता तपासल्यानंतर एमएमआरडीए या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई : राज्यात वाहनचालकांकडून सीटबेल्टच्या नियमाला हरताळ ; तीन वर्षांत २५ लाख प्रकरणांची नोंद

कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने १.६ किमी लांबीचा नरिमन पॉईंट – कुलाब्यादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पुलामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. मात्र येत्या काळात नरिमन पॉईंट, कुलाबा भागात मोठ्या संख्येने पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वाहनांची वाहनांची संख्या वाढणार आहे. भविष्यातील येथील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या उन्नत मार्गाव्यतिरिक्त येथे आणखी एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी आणि काही रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात नुकतीच महाराष्ट्र विधानसभ अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघातील आमदार राहुल नार्वेकर, महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान पूल बांधण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती हर्षिता नार्वेकर यांनी दिली.

हेही वाचा >>> मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो मार्गिका :पहिल्या टप्प्यात प्रतिसाद वाढेना ,पाच महिन्यांत केवळ ४५ लाख ६२ हजार प्रवाशांनी केला प्रवास

एमएमआरडीए नरिमन पॉईंट – कुलाब्यादरम्यान उन्नत मार्ग बांधणार आहे. मात्र लवकरच या परिसरात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प राबविले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नरिमन पॉईंट – वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान एक उड्डाणपूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. एमएमआरडीए या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी करणार आहे. याविषयी श्रीनिवास यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या