मुंबई : कबुतरांना खाद्य घालण्यास महानगरपालिकेने मनाई केली आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकले जात आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगतच्या दुकानांवरील छतावर आता अनधिकृत कबुतरखानाच तयार करण्यात आला आहे. तसेच, प्रशासनाच्या नियमांना बगल देत या ठिकाणी कबुतरांसाठी चणे, ज्वारी, मका आदी खाद्याचीही अनधिकृतपणे विक्री होत आहे.
रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी, व्यापारी दररोज कबुतरांना राजरोसपणे खाद्य टाकत असल्याने येथे कबुतरांची संख्या वाढू लागली आहे. दादरमधील कबुतरखाना परिसरातील कारवाईकडे पालिकेकडून कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. मात्र, अन्य ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार, राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर महापालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर मोठी कारवाई केली होती.
संबंधित कबुतरखाना ताडपत्रीने झाकल्यानांतर जैन समुदायाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, अनेक प्राणीप्रेमींनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. मात्र, कबुतरांना खाद्य टाकण्यावरील बंदीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला. दरम्यान, बंदी असतानाही अनेक ठिकाणी प्रशासनाचा डोळा चुकवून कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत.
अनेकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे, तर काहींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, नागरिकांना पालिकेच्या कारवाईचा धाक राहिलेला नसून अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणे सुरूच आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यापैकी स्थानकालगतच्या दुकानांवरील छतावर सर्रासपणे कबुतरांना खाद्य टाकले जात आहे. तसेच, खाद्य मिळत असल्याने शेकडो कबुतर या ठिकाणी जमा होत असून आता तेथे अनधिकृत कबुतरखानाच तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कबुतरांना प्लास्टिकच्या डब्यांमधून चणे, शेंगदाणे, ज्वारी, मका आदी खाद्य टाकले जाते. या खाद्याची एक वाटी १० रुपयांना विकली जात आहे. स्थानकातून बाहेर पडणारे अनेक प्रवासी व व्यापारी नियमितपणे कबुतरांना खाद्य टाकतात. परिणामी, कबुतरांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टिकच्या मोठ्या भांड्यात, छोट्या छोट्या वाट्यांमध्ये दाणे भरून ते विक्रीसाठी ठेवले जातात. त्यावर लाकडाची फळी ठेवल्याने त्यातील खाद्य थेट नजरेस पडत नाही. मात्र, दररोज ये – जा करणाऱ्यांकडून दाणे टाकताना अन्य लोकांनाही त्याची माहिती मिळते आणि तेही कबुतरांना खाद्य टाकतात. दरम्यान, माटुंगा, ठाकुर व्हिलेज, गोरेगाव, भांडुप येथील काही परिसरात कबुतरांना खाद्य टाकले जात असल्याचे समाजमाध्यमावर दिसून आले आहे.