मुंबई : मुंबईत आणखी सशुल्क शौचालये उभारणीसाठी महापालिका नवे धोरण आणणार आहे. गेल्या चार वर्षांपासून सशुल्क शौचालय बांधणी स्थगित करण्यात आली होती. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना आता नव्या स्वरूपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईत रस्त्याकडेला असलेली सार्वजनिक शौचालये आणि प्रसाधनगृहे ‘शुल्क द्या आणि वापरा’ या तत्वावर संस्थांमार्फत चालवली जातात. मात्र अस्वच्छता आणि नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारींनंतर चार वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने सशुल्क शौचालय उभारणीस स्थगिती दिली होती. सध्या मुंबईत ८५० सशुल्क शौचालये आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येसाठी आणखी शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यामुळे घनकचरा विभागाने धोरण आखण्याचे ठरवले आहे.

जुनी योजना..

या योजनेअंतर्गत एखादी संस्था स्वत:च जागा निवडून त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याकरिता पालिकेला प्रस्ताव देत असे. प्रस्ताव व्यवहार्य वाटल्यास परवानगी दिली जात होती. या पद्धतीनुसार शौचालयाची मालकी पालिकेकडे, मात्र देखभाल संस्था करीत असे.

धोरणात काय?

स्वच्छतागृहे आधुनिक पद्धतीने बांधली जातील. एक शौचकूप अपंगांसाठी असेल. तेथे प्रवेशासाठी उतार असेल. गर्दीच्या ठिकाणी २४ तास शौचालये खुली ठेवण्यात येतील. तसेच शुल्क आकारणी, स्वच्छता निकषांचे पालन आणि कंत्राटदारांवर कारवाईच्या दृष्टीने या धोरणात महत्त्वाची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.