कुलाबा परिसरात होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची झळ नौसेनेलाही बसली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने कुलाबा परिसरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर नौसेनेच्या क्षेत्राला मुबलक पाणीपुरवठा होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कुलाबा परिसराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाशी आणि नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा फटका कुलाबा परिसरातील नौसेनेच्या क्षेत्रालाही बसला आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार भारतीय नौसेनेकडूून करण्यात आली होती.
नौसेनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पालिकेने नौसेनेच्या क्षेत्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी या परिसरात ४५० ते ६०० मि.मी. व्यासाच्या अनुक्रमे १,१५० मीटर व २,९५० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी नौसेनेने २०.६६ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत ठेव स्वरूपात जमा केले आहेत.
कुलाबा परिसरात जलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत ५.९१ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंत्राटदाराची या कामासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
या कामासाठी १५.४५ कोटी रुपये खर्च येईल असा पालिकेचा अंदाज होता. मात्र निविदेत १४.५४ कोटी रुपयात काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात येणार असून ते युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर नौसेनेला पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
२० कोटींची ठेव
४५० ते ६०० मि.मी. व्यासाच्या अनुक्रमे १,१५० मीटर व २,९५० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामासाठी नौसेनेने २०.६६ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत ठेव स्वरूपात जमा केले आहेत.