रेल्वे स्थानकांतील पुस्तकांची दुकाने उद्दिष्टांपासून दूर
मुंबई : रेल्वे प्रवाशांची वाचनभूक भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर उभ्या करण्यात आलेली ‘ए. एच. व्हीलर बुक स्टॉल’ ही पुस्तकांची दुकाने उद्दिष्टापासून भरकटलेली दिसत आहेत. या दुकानांमध्ये वृत्तपत्रे आणि मासिकांपेक्षा खाद्यपदार्थाची प्राधान्याने विक्री होत असल्याचे दिसते. त्यामुळे प्रवासी वाचकांची गैरसोय होत असून या दुकानांमध्ये पूर्वीप्रमाणे केवळ वृत्तपत्र आणि मासिकांची विक्री व्हावी. तसेच वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी स्वतंत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अलाहाबाद येथे १८७७ साली देशातील पहिले ए. एच व्हीलर पुस्तकांचे दुकान सुरू करण्यात आले होते. सध्या देशातील २५८ स्थानकांवर ३७८ पुस्तकांची दुकाने, १२१ काउंटर टेबल आणि ३९७ ट्रॉली आहेत. परंतु रेल्वे स्थानकांवरील वाचनवारसा जपणारी ही दुकाने आता इतिहासजमा होताना दिसत आहेत. या ठिकाणी पुस्तकांऐवजी खाद्यपदार्थ, शीतपेये, घरगुती आणि प्रवासी वापराच्या वस्तू विकल्या जात आहेत. ‘मूळ उद्देश बाजूला सारून थाटण्यात आलेली ही बहूउद्देशीय दुकाने पुन्हा पूर्वीसारखी व्हावीत अशी वाचकांची मागणी आहे. त्यासंदर्भात अनेक तक्रारी वाचक करत आहेत. त्यामुळे वृत्तपत्र आणि मासिकांसाठी असलेली ही दुकाने मूळ उद्देशाप्रमाणेच सुरू ठेवावी,’अशी मागणी युनाईटेड फोरम ऑफ न्यूजपेपर्स, मुंबई या संघटनेने केली आहे.
स्वतंत्र दुकानांसाठीही परवानगी मिळावी..
वृत्तपत्रे आणि मासिकांच्या दुकानांमुळे फलाटावरील सुरक्षा किंवा स्वच्छतेला काहीही बाधा पोहोचत नाही. वाचक वृत्तपत्र खरेदी करून लगेच तेथून निघून जातात. त्यामुळे खूपवेळ गर्दीही नसते. मात्र, बहुउद्देशीय दुकानांमध्ये गर्दी होते. त्यामुळे वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी स्वतंत्र दुकाने असावित, अशीही मागणी युनाईटेड फोरम ऑफ न्यूजपेपर्स, मुंबई या संघटनेने केली आहे.