मुंबई : मालेगाव २००८ मधील स्फोटांमध्ये सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) याप्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाबत एनआयएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता निर्णयाची प्रत मिळाल्यावर तिचे विश्लेषण केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २००८ मध्ये मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि ९२ जण अधिक जखमी झाले होते. ३० सप्टेंबर २००८ ला हे प्रकरण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. २० जानेवारी २००९ मध्ये एकूण १४ जणांवर एटीएसकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीची असल्याचा आरोप होता. तसेच बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याचा आरोप होता. ११ एप्रिल २०११ ला प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केला गेला.

प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतल्यानंतर एनआयएने २०१६ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात, साध्वी यांच्यासह श्याम साहू, प्रवीण टाकळकी आणि शिवनारायण कलसंग्रा यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करून त्यांना दोषमुक्त करावे असे नमूद केले होते. पण न्यायालयाने ते फेटाळले होते. एकीकडे, एनआयएकडून तपास सुरू असताना ज्या कबुलीजबाबांच्या आधारे आरोपींना मोक्का लागू करण्यात आला, त्या आदेशाला आरोपींनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर, १३ मे २०१६ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने आरोपींवरील मोक्का हटवत असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणी मोक्का लावण्याच्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

अटक केलेल्या ११ जणांपैकी फक्त सातजणांविरुद्ध आणि दोन फरारी आरोपी, तर कलसंग्रा आणि संदीप डांगे यांच्याविरुद्ध पुरावे उपलब्ध असल्याचे एटीएसने म्हटले होते. परंतु, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली मोटारसायकल कलसंग्रा याच्या ताब्यात होती आणि ती स्फोटापूर्वी वापरत असल्याचे एनआयएने म्हटले होते. शिवाय, मोक्का लागू नसल्याने त्या कायद्याअंतर्गत नोंदवलेला साध्वी यांचा कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असेही एनआयने म्हटले होते. साध्वीच्या कबुलीजबाबानुसार, सह-आरोपींना स्फोटकांची व्यवस्था करण्यासाठी ले. कर्नल प्रसाद पुरोहितला बोलावले होते.

आरोपींविरुद्ध एटीएसचा खटला हा पूर्णपणे कबुलीजबाबांवर आधारित होता. परंतु, चतुर्वेदीचा कबुलीजबाब हा त्याचा छळ करून, जबरदस्ती नोंदवला होता. या प्रकरणी तपासात बराचसा वेळ निघून गेल्याने घटनास्थळावरून कोणतेही अतिरिक्त पुरावे मिळू शकले नाहीत, असे एनआयएने म्हटले आरोपपत्रात म्हटले होते. एटीएसच्या तपासात विसंगती असल्याची सबब पुढे करून एनआयएने काही साक्षीदारांचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर पुन्हा नोंदवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही यंत्रणांनी परस्पर विरोधी दाव्यांचा फायदा आरोपींना झाल्याचा आरोप होत असताना आता एनआयए याप्रकरणी पुढे कोणती पावले उचलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यावर एनआयएच्या अधिकाऱ्याने निर्णयाचे विश्लेषण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तसेच या निकालानंतर एनआयए पुढे अपिल करणार का? असे एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांना विचारले असता त्यांनी निर्णयाची प्रत मिळवून तिचे विश्लेषण केले जाईल. त्यानंतरच याबाबत उत्तर देता येईल, असे सांगितले.