…म्हणून सचिन वाझे पहाटे ४.३० वाजता पुन्हा साईटवर गेले होते; NIA च्या चार्जशीटमध्ये खुलासा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपासाला दिशा देणारं हे गूढ उकललं आहे

NIA, Sachin Waze, Antilia bomb scare
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपासाला दिशा देणारं हे गूढ उकललं आहे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा एकदा साईटवर का गेले होते याचा उलगडा झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपासाला दिशा देणारं हे गूढ उकललं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्यानंतर सचिन वाझे पुन्हा दोन तासांनी घटनास्थळी गेले होते.

एनआयएने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पार्क केलेल्या गाडीत आपलं पोलीस ओळखपत्र राहिल्याची भीती होती. साक्षीदाराने ही माहिती दिल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितलं आहे.

सचिन वाझेंचा क्राइम युनिटमधील सहकारी मुख्य साक्षीदार असून आरोपी चालवत असलेल्या एसयुव्हीचा पाठलाग करत होता. आपल्याला हे कार्यालयीन काम असल्याचं सांगत फसवण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे.

प्रदीप शर्माला देण्यात आली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी; सचिन वाझेने दिली होती नोटांनी भरलेली बॅग

सीसीटीव्ही फुटेजमध्ये २५ फेब्रुवारीला ही एसयुव्ही पहाटे २ वाजून १० मिनिटांनी अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पार्क केल्याचं दिसत आहे. सीसीटीव्हीत कुर्ता घातलेली आणि मास्क असणारी एक व्यक्ती पहाटे ४.३० वाजता पुन्हा घटनास्थळी येऊन एसयुव्हीत पाहणी करत असल्याचं दिसत आहे.

जबाबात देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोघे ठाण्यातील वाझेंच्या निवावस्थानाहून स्कॉर्पिओतून रात्री १ वाजता निघाले होते. मुलुंड टोल नाका पार केल्यानंतर सचिन वाझेंनी चेंबूरमध्ये इनोव्हा चालवायला आपल्याकडे घेतली. जेव्हा सहकाऱ्याने वाझे यांना आपण कुठे जात आहोत विचारलं तेव्हा त्यांनी हे सिक्रेट सीआययु मिशन असल्याचं सांगितलं.

अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर सचिन वाझे पाच मिनिटं स्कॉर्पिओत बसून राहिले होते. यानंतर गाडीच्या स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूने ते बाहेर पडले आणि सहकाऱ्याने पार्क केलेल्या इनोव्हाच्या दिशेने चालत गेले.

जेव्हा सचिन वाझे सहकाऱ्यासोबत इनोव्हातून भायखळ्याला पोहोचले तेव्हा आपलं मुंबई पोलीस आयकार्ड सापडत नसल्याचं सांगितलं. त्यांनी सहकाऱ्याला डॅशबोर्डमध्ये पाहण्यास सांगितलं. पण तिथेही आयकार्ड सापडलं नाही. ३ वाजून ४० मिनिटांनी दोघे वाझेंच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुन्हा एकदा सचिन वाझेंनी कारमध्ये शोध घेतला पण आयकार्ड सापडलं नाही. आरोपपत्रात हे आयकार्ड शेवटी सापडलं की नाही याचा उल्लेख नाही.

दरम्यान बॉम्बशोध पथक आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा अलर्ट जारी झाल्यानंतर सचिन वाझे चिंतेत होते. साध्या कपड्यांमध्ये असणारे सचिन वाझे वारंवार गाडीजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अँटिलियाचे सुरक्षारक्षक त्यांना तसं न कऱण्यास सांगत होते. गाडीत स्फोटकं असल्याचं समोर आल्यानतंरही वाझे वारंवार गाडीजवळ येत होते. यावेळी अखेर त्यांना एका कर्मचाऱ्याने आमचा जीव धोक्यात का घालत आहात? अशी विचारणादेखील केली.

ओबेरॉय हॉटेलमधील खोली १०० दिवस आरक्षित!

सचिन वाझेंनी ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलातील एक खोली वेगवेगळ्या नावाने १०० दिवस आरक्षित केली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्रात दिली आहे. अंबानी यांच्याकडून मोठी खंडणी उकळण्याचा तसेच दहशतवादी कट उधळल्याचा आव आणण्याचा वाझे यांचा डाव असल्याचेही या आरोपपत्रात नमूद आहे.

‘चकमक’फेम अशी आपली पुन्हा ओळख निर्माण करण्यासाठी वाझे यांनी हा कट रचल्याचे आरोपपत्रात म्हटले असून त्याची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. सुशांत खामकर या नावे बनावट आधार कार्ड बनवून वाझे यांनी ओबेरॉय हॉटेलात १०० दिवसांसाठी खोली आरक्षित केली. या खोलीतूनच संपूर्ण कट रचला गेला. मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ या कामासाठी वापरल्याचे ठरल्यानंतर या गाडीचा नोंदणी क्रमांक वाझेंनीच बदलला. नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका रेंज रोव्हरचा नोंदणी क्रमांक त्यासाठी वापरण्यात आला. ही स्कॉर्पिओ डॉ. सॅम न्यूटन यांची असल्याची व या गाडीचे नूतनीकरण करण्यापोटी पैसे न दिल्याने ती हिरेन याच्या ताब्यात होती, याची कल्पना वाझेंना होती. ती गाडी वाझेंनी विकत घेतली होती, असेही या आरोपपत्रात नमूद आहे. हिरेन याच्याकडील ही गाडी या कटासाठी वापरण्याचे निश्चित झाल्यानंतर वाझेंनी ती आपल्या ठाण्यातील सोसायटीच्या आवारात काही दिवस ठेवली व नंतर त्याचा वापर केला, असेही त्यात नमूद आहे.

हा कट फसल्यानंतर तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. त्यावेळी या कटातील मनसुख हिरेन हा दुवा कच्चा असल्याचे वाझेंच्या लक्षात आले. त्यानंतर हिरेन याला संपविण्याचे ठरविण्यात आले. चकमकफेम निवृत्त सहायक आयुक्त प्रदीप शर्मा व गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी हिरेन हत्या कटाची अंमलबजावणी केली. यासाठी आवश्यक असणारी मोठी रक्कम वाझे याने पुरविली, असेही आरोपपत्रात नमूद आहे. हिरेन यांची हत्या कशी केली गेली, याचा आरेखनासह तपशील या आरोपपत्रात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nia chargesheet on antilia bomb scare sachin waze feared id card was in suv sgy

ताज्या बातम्या