शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्रीआदिती तटकरे हे सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषीदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे याचा उल्लेख करत करोना काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

हेही वाचा- कृषी कायद्यांबाबत शरद पवारांनी मांडली भूमिका ; जाणून घ्या काय म्हणाले…

शेतकरी राज्याचे वैभव

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी राजा राज्याचे वैभव असून ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, करोना असे संकट आले, मात्र शेतकरी डगमगला नाही. सोन्यासारखे पिक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते अशा वेळी शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा- गाझीपूर सीमेवरील हाणामारी प्रकरणी भारतीय किसान युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन कामकाजाची सुरुवात

आमचे सरकार आल्यानंतर कामकाजाची सुरुवात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन केली. कोरानाच्या संकटाला दीड वर्षापासून राज्य तोंड देत आहे. मात्र या काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले आहे ते विसरता येण्यासारखे नाही, असे सांगतांनाच उद्योगाप्रमाणे शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने विकेल ते पिकेल ही योजना सुरु केली. शेतकरी जे पिकवेल ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांची परंपरा पुढे नेत असतानाच राज्यातील शेतकरी हिताला धक्का लागेल अशी एकही बा‍ब राज्यात होऊ देणार नाही. असे सांगतांनाच शेतकऱ्यांनी प्रयोगशिलता जपली पाहिजे. मर्यादित स्वरुपात प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम एकत्रितपणे केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No decision will be taken that will harm the interests of farmers says cm uddhav thackeray srk
First published on: 01-07-2021 at 17:50 IST