मुंबई : उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप विरोधी पक्षांना फोन करून मते मागत आहेत. परंतु, संविधानाच्या विरोधात जाऊन ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, आमदार-खासदार ५० कोटींना विकत घेतले, त्याच पक्षांकडे मते का मागता, असा सवाल करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची मते फुटणार असल्याचा दावा केला.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दूरध्वनी करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका केली.

शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप केवळ आमच्याकडेच नाही तर देशभरात अशी मते मागत आहे, याचे मला आश्चर्य वाटत आहे. भाजप आपल्याकडे बहुमत आहे, असे म्हणत असेल तर त्यांना अशाप्रकारे मत मागायची गरज नाही. हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची किंवा संविधान पायदळी तुडवून आमदार, पक्ष फोडणे, दहशत निर्माण करणे अशा लोकांविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे अशा दूरध्वनीकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो. भाजपने मराठी माणूस दिला असता तर त्यावर चर्चा होऊ शकली असती, पण आता नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

कागदावर मोदींकडे बहुमत दिसत आहे, पण प्रत्यक्षात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन्ही बाजूंसाठी सोपी नाही, असे सांगत प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी मराठी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका आंध्र किंवा तेलंगणाचे खासदार घेतील का? शिवाय नकली शिवसेनेची मते फुटण्याची भीती भाजपला वाटत आहे, असे सांगतानाच राहुल गांधींनी देशात जे वातावरण निर्माण केले आहे, त्यामुळे एनडीएतच विरोधी मतदान होण्याचीशक्यता आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध

भाजप आणि सरकारचे हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे ढोंग भारत-पाकिस्तान सामान्यामुळे उघडे पडले आहे. हे सामने महाराष्ट्रात झाले असते तर शिवसेना ठाकरे गटाने ते उधळून लावले असते. हिंमत असेल तर महारष्ट्रात हे सामने घेऊन दाखवा. मात्र तुमच्यात सम नाही म्हणून तुम्ही पळवाटा शोधतात. कारण तुमचे पैसे त्यामध्ये गुंतलेले आहेत. तुमचा जुगार त्यामध्ये असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला. भारत-पाकिस्तान सामने सुरू असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला हार घालून स्वत:ला वारसदार म्हणणारे गप्प का, असा सवाल करीत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.