महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आज मातोश्रीवर नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार दगाफटका करणार नाहीत अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तुम्ही पक्षाची भूमिका मांडत आहात का? या प्रश्नावर राऊत यांनी मी उद्धव ठाकरेंचे विचार मांडत आहे असे उत्तर दिले.

अडीचवर्ष मुख्यमंत्रीपदासह समान खातेवाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अजून सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपाने फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा भाजपा नेत्यांचा दावा आहे.

भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे असे शिवसेना नेते संजय राऊत काल म्हणाले. मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले.

त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले मुनगंटीवार
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No talks between mohan bhagwat uddhav thackeray yet sanjay raut dmp
First published on: 07-11-2019 at 11:34 IST