मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती घेणार असून हे कामपासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत लोअर परळ (जी दक्षिण), दादर, प्रभादेवी (जी उत्तर) आसपासच्या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात अस्तित्वात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जल अभियंता विभाग हाती घेणार आहे. गुरूवार, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता हे काम हाती सुरू करण्यात येणार असून शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते पूर्ण होईल. या कामासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत जी दक्षिण व जी उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा – आठ उमेदवारांना लाखाहून अधिक मते

या विभागात पाणीपुरवठा बंद

जी दक्षिण विभाग : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ०४.३० ते सकाळी ०७.४५) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०२.३० ते दुपारी ०३.३०) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

हेही वाचा – सदोष करारामुळे ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ नाकारणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायटीला प्रमाणपत्र देण्याचे आदेश

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.००) पाणीपुरवठा अंशत: बंद राहील. (३३ टक्के)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.