आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील मालवणी भागातून बेपत्ता झालेला आणखी एक तरूण गुरुवारी घरी परतला. नूर मोहम्मद असे या तरुणाचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी वाजिद शेख या तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले होते. तोही घरी परतत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला सोडून देण्यात आले. आता नूर मोहम्मद परतल्यामुळे त्याच्याकडेही पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्याचा इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येतो आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथील तीन तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अयाज सुलतान, मोहसीन शेख आणि वाजिद शेख अशी या तरुणांची नावे होती. त्यानंतर आणखी दोन तरूण घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामध्ये नूर मोहम्मदचा समावेश होता. आता वाजिद शेख आणि नूर मोहम्मद घरी परतले आहेत. अन्य तरुणांचा शोध घेण्यात येतो आहे.