रेल्वे फलाट आणि गाडीचा फुटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीबद्दल सध्या रान उठले असताना गुरुवारी रात्री कुर्ला येथे या पोकळीत पडून तन्वीर शेख या ३१ वर्षीय तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.
गोवंडी येथे राहणारा हा तरुण कुल्र्याच्या फलाट क्रमांक सहावरून मुंबईच्या दिशेने जाणारी जलद गाडी पकडत असताना त्याचा हात सटकला. फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळीत पडल्याने त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या ‘जीवघेण्या’ पोकळीबाबत रेल्वे प्रशासनाचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
मध्य रेल्वेची बेपर्वाई मुंबईकरांच्या जिवावर बेतत असतानाही रेल्वे प्रशासनाला त्याची फिकीर नाही आणि राजकीय पक्षही ढिम्म आहेत. ‘मध्य रेल्वेवरील या जीवघेण्या पोकळीची तीव्रता आम्हालाही कळते. त्यासाठीच आम्ही विविध स्थानकांत फलाटाची उंची वाढवली आहे. बदलापूर, ठाणे या स्थानकांत ही उंची वाढविली आहे. या पुढे इतर कोणत्याही स्थानकातील फलाटाची उंची वाढविण्याचा आमचा विचार नाही,’ अशी मख्ख प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली. ठाणे स्थानकात फलाट दोनवर तर ही उंची वाढल्याचे प्रवाशांना जाणवतदेखील नाही आणि जणू या दोनच स्थानकांत हा प्रश्न होता, असे भासवत इतर स्थानकांबद्दल विचार नसल्याचे निगम यांनीच स्पष्ट केल्याने प्रवाशांमधला संताप वाढण्याचीच चिन्हे आहेत.घाटकोपर येथील फलाट दोनवरील खड्डय़ात पडून एका तरुणीने हात गमावल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता कुल्र्यातील पोकळीत पडून एका तरुणाला कायमचे अपंगत्व मध्य रेल्वेने बहाल केले आहे.

प. रेल्वेकडे डोळे
फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळी कमी करण्यासाठी फलाटाची उंची वाढवणे गरजेचे आहे. ती जास्तीत जास्त ८४० मिमी एवढीच वाढवता येऊ शकते. मात्र ही मर्यादा ९२० मिमी एवढी करावी, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाला पाठवले आहे. पश्चिम रेल्वेला रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाल्यास ही मान्यता मध्य रेल्वेलाही लागू होईल आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढेल, असेही मुकेश निगम यांनी सांगितले. म्हणजे तोवर मध्य रेल्वे गप्प बसणार, असेच सूचित केले.