मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पुरुष अंमलदारांच्या कामाचा कालावधीही आठ तास करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार मंगळवारी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून लवकरच त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सण, निवडणुका अशा अपवादात्मक परिस्थितीत वर्षांतील ३५ दिवस कामाचा कालावधी १२ तास करण्याची मुभा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांडे यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य आणि १६ तास आराम असा निर्णय घेतला. त्यानंतर पुरुष अंमलदारांनीही अशीच मागणी केली. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या मार्गदर्शानाखाली काम करणाऱ्या समितीने त्याबाबत विविध शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार पांडे यांनी अंमलदारांच्या कामाचा कालावधीही आठ तास करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात करण्यास सुरूवात झाली आहे. लवकरच वरिष्ठ अधिकारी सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्याचा आढावा घेणार आहेत.

 अंमलदारांना आठ तास कामासह आता ५० वर्षांखालील पोलिसांना आठ तास काम आणि १६ तास आराम, तर ५० वर्षांवरील पोलिसांसाठी १२ तास काम आणि २४ तास आराम अशी शिफारस करण्यात आली होती. याशिवाय गणेशोत्सव, नवरात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी विविध सण, निवडणुका या अपवादात्मक परिस्थितीत वर्षांतील ३० दिवस अंमलदारांच्या कर्तव्याचा कालावधी १२ तास करण्याची मुभा अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी विभागीय परिस्थितीनुसार वर्षांतील ५ दिवस १२ तास डय़ुटी अंमलबदारांना लावू शकतो. त्यापेक्षा जास्त दिवस कर्तव्याचा कालावधी १२ तास करायचा असेल, तर पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now the police have eight hours of duty review soon by senior executives
First published on: 18-05-2022 at 00:02 IST