भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टर्ससाठी आयएनएस कुंजाली आणि शिक्रा अशा दोन हवाई तळांचा वापर केला जातो. मात्र नौदलाच्या लढाऊ विमानांसाठी आजवर मुंबईमध्ये कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. मात्र येत्या तीन महिन्यांत हा प्रश्न सुटणार असल्याचे संकेत भारतीय नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी शुक्रवारी दिले. सांताक्रूझ विमानतळावर भारतीय नौदलाला येत्या तीन महिन्यांत हक्काची जागा मिळणार असून त्यास आता सरकारची मंजुरी मिळणे अंतिम टप्प्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौदल दिनाच्या निमित्ताने ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना व्हाइस अ‍ॅडमिरल लुथ्रा यांनी ही माहिती दिली. आयएनएस विक्रमादित्यवर मिग२९के या लढाऊ विमानांचा ताफा तैनात असतो. मुंबई परिसरात असताना या ताफ्याला उड्डाणासाठी केवळ युद्धनौकेवरील हवाईपट्टीच उपलब्ध असते. इतरत्र मुंबईत कुठेही नौदलासाठी मोठा रनवे उपलब्ध नाही. त्यामुळे नौदलाच्या लढाऊ विमानांची पंचाईतच होते.

मात्र गेल्या दोन वर्षांत दहशतवादी हल्ले आणि खासकरून पठाणकोटच्या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने सर्वच दलांच्या तळांच्या सुरक्षेसंबंधी धोरणामध्ये बदल केले असून आता सर्व प्रकारची सुरक्षा उपलब्धता चाचपून पाहिली जात आहे. त्याचाच एक प्रयोग म्हणून यमुना एक्स्प्रेसवेवर हवाई दलाची लढाऊ विमाने उतरवण्याचे प्रयोगही यशस्वीरीत्या राबविण्यात आले. तर मुंबईमध्येही जुहू विमानतळावरील हवाईपट्टी हवाई दलाच्या मालवाहू विमानांसाठी वापरण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात पश्चिम किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेसाठी सुमारे नऊ दिवसांचा युद्धसराव ‘पश्चिम लहेर’ या नावाने अरबी समुद्रात पार पडला. यामध्ये नौदलाबरोबरच हवाई दल आणि तटरक्षक दलही त्यात सहभागी झाले होते. या युद्धसरावादरम्यान ‘आयएनएस विक्रमादित्य’वरील मिग२९के या लढाऊ विमानांचा ताफा सांताक्रूझ विमानतळावर प्रथमच उतरला होता. आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर युद्धसदृश परिस्थितीमध्ये नेमके काय करता येऊ शकते, याची चाचपणी करण्यात आली. सांताक्रूझ विमानतळावर नौदलाला मिळणाऱ्या हक्काच्या जागेमुळे तिथे लढाऊ विमाने ठेवण्याची व त्यांच्या उड्डाणांची सोय होणार आहे. यापूर्वीही युद्धसरावांसाठी नौदलाला ही हवाईपट्टी उपलब्ध होती पण लढाऊ विमाने तिथे ठेवता येत नव्हती. या संदर्भात विचारता व्हाइस अ‍ॅडमिरल लुथ्रा म्हणाले की, सांताक्रूझ विमानतळावरील रनवे तुलनेने मोठा असून तो उपलब्ध होणे ही महत्त्वाची घटना आहे. तीन महिन्यांत या  प्रक्रिया व्यवस्थित पार पडतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now the the mig 29 k fly from santacruz airport
First published on: 03-12-2016 at 01:25 IST