दूरदर्शनवर १९८६-८७ साली सईद मिर्झा आणि कुंदन शहा दिग्दर्शित ‘नुक्कड’ या गाजलेल्या मालिकेतून ‘गणपत हवालदार’ची व्यक्तिरेखा रंगविणारे ज्येष्ठ अभिनेते अजय वढावकर (५९) यांचे शुक्रवारी पुण्यात कर्करोगाने निधन झाले. ‘नुक्कड’ खेरीज त्यांनी मोजक्या मालिका तसेच जाहिरातपटांमधूनही काम करून आपल्या नावाची मोहोर उमटविली होती.
अजय वढावकर यांनी मराठीत ‘चंगू मंगू’सारखा चित्रपट केला होता. ‘इंग्लिश बाबू देसी मेम’, ‘यस बॉस’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. मात्र, त्यांना मधुमेहामुळे एक पाय गमवावा लागला. तरीही ते मोठय़ा जिद्दीने पुन्हा उभे राहिले होते. त्यानंतर त्यांनी झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम सुरू केले. बालाजी टेलीफिल्म्सची निर्मिती असलेल्या या मालिकेमुळे वढावकर यांचा चेहरा तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने घराघरात पोहोचला होता.
वढावकर यांना विनोदी अभिनेता  जॉनी लिव्हर आणि बालाजी टेलीफिल्म्स यांनी आर्थिक मदत दिली होती. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या चित्रपट शाखेच्या वतीने त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली होती.
हुकलेली संधी
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘राम की गीता, श्याम की सीता’ या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे मुहूर्ताचे दृश्य नटराज स्टुडिओत चित्रित करण्यात आले होते. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या या चित्रपटात दुहेरी भूमिका होत्या. त्या वेळी मुहूर्ताच्या दृश्यात वढावकर यांनी अमिताभ यांच्याबरोबर काम केले. मात्र, पुढे काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला तो कायमचाच. आपल्या आयुष्यात हा फार महत्त्वाचा चित्रपट होता, याची आठवण काढून ते कायम हळहळ व्यक्त क रायचे.